पिंपरी : राज्यातील सर्वांत मोठे तीर्थक्षेत्र असलेल्या आणि पुणे जिल्ह्यातील महत्त्वाची नगरपरिषद म्हणून ओळख असलेल्या आळंदी नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) या पक्षातच लढत होण्याची चिन्हे आहेत. तिन्ही पक्षांनी स्वबळाची तयारी सुरू केली आहे. तर खासदार, आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (ठाकरे) पक्षात निवडणूक जाहीर होऊन कोणत्याही हाचलाची सुरू नाहीत. खासदार, आमदारांची भूमिकाही अस्पष्ट आहे.
नगरपरिषदेच्या २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक दहा नगरसेवक निवडून आले होते. नगरपरिषदेवरील तत्कालीन शिवसेनेचे वर्चस्व मोडीत काढून भाजपने सत्ता मिळविली होती. भाजपच्या वैजयंती उमरगेकर-कांबळे या तत्कालीन शिवसेनेच्या भाग्यश्री रंधवे यांचा अवघ्या ३७ मतांनी पराभव करून नगराध्यक्षपदी जनतेतून निवडून आल्या होत्या. तत्कालीन शिवसेनेचे सहा, तर शिवसेना पुरस्कृत दोन अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. भाजप आणि तत्कालीन शिवसेनेनेच चिन्हावर निवडणूक लढविली होती. तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक आघाडी केली होती.
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे डॉ. अमोल कोल्हे हे खासदार आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे बाबाजी काळे हे या भागाचे आमदार आहेत. यामुळे राजकीय समीकरणेही बदलली आहेत. आळंदीत भाजपखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (शिंदे) पक्षाची ताकद आहे. खासदार आणि आमदार असूनही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (ठाकरे) पक्षामध्ये शांतता आहे.
नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने इच्छुकांची संख्या मोठी आहे. महायुतीमधील भाजपकडे इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. भाजपकडून सतीश चोरडिया, प्रशांत कुऱ्हाडे, पांडुरंग वहिले, किरण येळवंडे हे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रकाश कुऱ्हाडे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविणार की स्थानिक आघाडीच्या माध्यमातून हे जाहीर न करताच पक्षाचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी प्रचाराचा शुभारंभही करण्यात आला. शिवसेना (शिंदे) पक्षाने दोन प्रभागांत उमेदवार जाहीर केले आहेत. पण, नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला नसून, भाजपमधील नाराजावर त्यांची मदार असल्याची चर्चा आहे. आळंदीत माजी आमदार दिलीप मोहिते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचे वर्चस्व आहे. भाजपचे संघटन मजबूत असून, जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आळंदीत महायुतीमध्येच लढत होण्याची शक्यता आहे.
खासदार कोल्हे, आमदार काळे यांची भूमिका अस्पष्ट
शिरूर लोकसभा मतदार संघाचे दुसऱ्यांदा खासदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडणुकीबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही. पक्षाचा खासदार असूनही नगराध्यक्ष, नगरसेवक पदाच्या इच्छुकांच्या मुलाखती झालेल्या नाहीत. शिवसेना (शिंदे) ठाकरे पक्षाचे काही प्रभागात वर्चस्व आहे. पण, विधानसभा निवडणुकीत झालेल्या सर्वपक्षीय मदतीमुळे या पक्षाचे आमदार बाबाजी काळे यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे खासदार, आमदार असलेल्या महाविकास आघाडीत शांतता दिसून येत आहे.
दहा प्रभाग, २१ नगरसेवक
नगरपरिषदेच्या निवडणुकीत दहा प्रभाग असून, २१ नगरसेवक आहेत. नऊ प्रभागांतून दोन आणि एका प्रभागातून तीन नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. आळंदीत २५ हजार ३३१ मतदार असून, ३० मतदान केंद्र असणार आहेत.
