पिंपरी : विधानसभा निवडणुकीत मावळमधून अपक्ष लढलेले बापू भेगडे यांचा प्रचार करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष रामदास काकडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती बाबुराव वायकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष जाधव, माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, बापू भेगडे यांचा सोमवारी पक्षप्रवेश झाला नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले.  माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदिप कंद, रविंद्र भेगडे ,माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यावेळी उपस्थित होते.

मावळमध्ये विधानसभेला महायुतीत बंडखोरी झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात असलेले बापू भेगडे यांनी अपक्ष निवडणूक लढवत ‘मावळ पॅटर्न’ उदयास आणला होता. भेगडे यांना भाजपचे नेते बाळा भेगडे, गणेश भेगडे यांनी पाठिंबा दिला होता. निवडणुकीत बापू यांचा पराभव झाला. त्यानंतर बापू भेगडे यांचा गट भाजपमध्ये प्रवेश करेल अशी अटकळ बांधली जात होती. परंतु, सोमवारी बापू यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण, त्यांनी स्वत: प्रवेश केला नाही.

बापू यांचे पुतणे माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य सचिन घोटकुले, संतोष मुऱ्हे, लोणावळा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अरुण चव्हाण, जिल्हा परिषदे माजी समाजकल्याण सभापती अतिशराव परदेशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव असवले, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, खरेदी-विक्री संघसंचालक बाजीराव वाजे, माजी नगरसेवक अरुण माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आम्ही काम करू, असे भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी सांगितले.

चव्हाण म्हणाले,  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाखाली देश आणि राज्याच्या प्रगतीचा नवा अध्याय रचला जातोय. भाजपाच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवून या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपावर या सर्वांनी ठेवलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू, भाजपाची विचारधारा ही व्यक्तिनिष्ठ नसून पक्षाच्या विचारधारेसोबत प्रत्येक कार्यकर्ता काम करतो आणि ही विचारधाराच आपल्याला विजयाकडे घेऊन जाते. जे प्रश्न घेऊन याल ते सोडवले जातील तसेच पक्ष तुमच्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे त्यांनी नमूद केले. सर्व ताकद लावून ही विचारधारा तळागाळात पोहोचवायची आहे असे आवाहनही चव्हाण यांनी  केले.