पुणे : सायंकाळनंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होता, या वर्षीपासून मानाचे पाच गणपती टिळक पुतळ्यापासून मार्गस्थ झाल्यानंतर त्या पाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि अखिल मंडई मंडळ या मंडळांनी घेतला आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त पुनीत बालन आणि अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संजीव जावळे, संजय मते, विश्वास भोर या वेळी उपस्थित होते.

बालन म्हणाले, ‘ग्रहणकाळ रविवारी (७ सप्टेंबर) दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांनी सुरू होत आहे. किमान त्या आधी अर्धा तास सर्व गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती मंदिरात नेणे आवश्यक आहे. याकरिता मिरवणूक लवकर संपविणे आवश्यक असून, मानाचे पाच गणपती टिळक पुतळा चौकातून मार्गस्थ झाल्यानंतर त्या पाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने घेतला आहे. याच प्रकारे सर्व गणेशमंडळांनी सहकार्य केल्यास पोलीस आणि प्रशासन यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल.’

‘मागील तीन वर्षे पोलिसांनी दिलेल्या वेळेत सायंकाळी सात वाजता ‘श्रीं’ची आरती करून मिरवणुकीत सामील होण्यासाठी तयार असतो. मात्र, गेली काही वर्षे पोलीस प्रशासनाने शब्द पाळला नाही. सायंकाळी मिरवणुकीत सामील होण्यासाठी तयार असूनही आम्हाला वेळेवर सहभागी करून घेण्यात आले नाही. त्या अनुभवामुळे यंदा विसर्जन मिरवणुकीत लवकर सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व गणेशोत्सव मंडळांनी यंदा रविवारी दुपारी बारापूर्वीच विसर्जन मिरवणूक संपवावी,’ असे आवाहन थोरात यांनी केले.

विसर्जन मिरवणुक लवकर संपण्यासाठी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून मिरवणुकीतील वाद्य पथके कमी करण्यावर भर देण्यात येणार आहे. मानाच्या पाच गणपती मंडळांनाही त्याबाबत विनंती करण्यात येणार आहे. – पुनीत बालन, विश्वस्त, भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट.

यंदा नेहमीप्रमाणे अनंत चतुर्दशीला (६ सप्टेंबर) गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. मात्र, चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीच, रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास खग्रास चंद्रग्रहण सुरू होत आहे. ग्रहणकाळात देवतांच्या मूर्ती झाकून ठेवाव्या लागतात. त्यामुळे रविवारी दुपारी बारा वाजण्यापूर्वीच सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन पूर्ण होणे आवश्यक आहे. – अण्णा थोरात, अध्यक्ष, अखिल मंडई मंडळ.