पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा जोर शेवटच्या आठवड्यात वाढणार आहे. उद्यापासून (६ मे) सभांचा धडाका सुरू होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार आहेत.मावळमध्ये महायुतीचे खासदार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांच्यात लढत होत आहे. दोघांमध्ये कडवी झुंज होताना दिसत आहे. तिसऱ्या टप्प्यातील प्रचार रविवारी संपल्याने चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा जोर वाढणार आहे. मावळसाठी १३ मे रोजी मतदान होणार असून ११ मे रोजी प्रचार थांबणार आहे. महायुतीचे उमेदवार बारणे यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी (६ मे) पिंपरी-चिंचवडमध्ये रहाटणी येथे, तर पनवेलमध्ये खारघर येथे प्रचार सभा घेणार आहेत. रहाटणी येथील कापसे लॉन्स येथे दुपारी दोन वाजता त्यांची सभा होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार भाजपसोबत?; वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा दावा 

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे मंगळवारी (७ मे) संध्याकाळी सहा वाजता कर्जत तालुक्यातील चौक फाटा मैदानावर जाहीर सभा घेणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी (९ मे) पिंपरी-चिंचवडमध्ये एक आणि मावळ विधानसभा मतदारसंघात एक अशा दोन सभा घेणार आहेत. निवडणुकीच्या प्रचाराची सांगता शनिवारी (११ मे) पिंपरी-चिंचवडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रोड-शो ने होणार आहे. महायुतीच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी बुधवारी (८ मे) चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, आमदार जयंत पाटील, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ( ए) अध्यक्ष दीपक निकाळजे सभेला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Campaigning in maval lok sabha constituency will intensify in the last week pune print news ggy 03 zws