शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहेत. मनात आहेत, आश्रयदाते आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुढे जाऊच शकत नाही. नुसतं असं म्हणून चालणार नाही. आता वेळ आलीय ऍक्शन घेण्याची. राज्यपाल म्हणून कोश्यारी यांना किंमत दिली. इथं यायचं आणि काही ही बोलायचं? हे ऐकून घ्यायच. बिळातून बाहेर या आणि सांगा आम्हाला हे राज्यपाल नकोत. त्यांना कुठं पाहिजे तिथं पाठवून द्या. महाराष्ट्राच्या बाहेर पाठवून द्या. असं म्हणत छत्रपती संभाजी राजे यांनी शिंदे- फडणवीस यांना टोला लगावला आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये सर्वपक्षीय आंदोलकांना संबोधित करत होते. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- सीमाप्रश्नी महाविकास आघाडीच्या खासदारांना दिलेली वेळ अमित शहांकडून रद्द

छत्रपती संभाजी राजे यांनी पिंपरी- चिंचवड मधील सर्वपक्षीय बंदला पाठिंबा देत सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या व्यक्तीविरोधात आज एक दिवसीय बंद पाळण्यात आला. यां बंदला संभाजीराजेंनी पाठिंबा दर्शवला आहे.

छत्रपती संभाजी राजे म्हणाले की, विरोधी पक्षात असतो तरी बंदमध्ये सहभागी झालो असतो. छत्रपती शिवाजी महाराजांपुढं काही ही नाही. माझं चॅलेंज आहे या व्यासपीठावरून. छत्रपती शिवाजी महाराजांना हृदयातून दैवत मानत असाल तुम्ही सुद्धा जाहीर पणे एकत्र व्यापीठावर यायला पाहिजे आणि सांगायला हवं महाराजांचा अवमान झालेला आहे. जो त्यांचा अवमान करतो त्याला महाराष्ट्रात राहण्याची अधिकार नाही. सगळ्यांनी एकत्र यायला हवं, पण का येत नाहीत. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे संस्कार आपल्याला दिलेले नाहीत. अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

हेही वााच- गुजरातमधील विजयानंतर आदित्य ठाकरेंचं भाजपा-शिंदे गटाला आव्हान; म्हणाले, “महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारने आता…”

महाराष्ट्र हे शांतता प्रिय राज्य आहे. कोणाला ही उगाच अंगावर घेत नाही. अंगावर आलं तर मग महाराष्ट्र दाखवतो. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांनी घडवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहेत. महाराष्ट्रात एक माणूस नाही जो म्हणेल की आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांना मानत नाहीत. जो तसं म्हणेल त्याचा थेट कडेलोट होतो. याची सर्वांना कल्पना आहे. शिवाजी महाराज यांचा ज्यांनी अवमान केला त्या कोश्यारी यांची अजून ही आपण चर्चा करत आहोत. त्यांनी शिवरायांचा दोनदा अवमान केला. साधी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली नाही, येवढा मग्रुरी पणा. आता दिलगिरी व्यक्त केली तरी आम्ही ऐकणार नाहीत. अशा माणसाला आपण सहन करतोय. महात्मा फुले, सावित्रीबाई यांच्याबद्दल ते बोलतात, त्यांची बोलण्याची हिम्मत तरी कशी होते असेही संभाजी राजे म्हणाले. 

हेही वाचा- ‘आप आणि भाजपाचं साटंलोटं’ म्हणणाऱ्या राऊतांना शेलारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “काही लोक संपादक आहेत की पादक…”

शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रेम आहे तर तुम्ही गप्प का आहात? अस म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न करत तुम्ही वर काय निरोप पोहचवला हे सांगा. महाराष्ट्रातून त्या भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी झाली पाहिजे हे तुम्ही सांगितलं का? राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला तेव्हा सर्वात अगोदर मी आवाज उठवला. त्यांची हकालपट्टी करा अशी मागणी केली. किती दिवस संयम ठेवायचा? त्यांच्या पाठोपाठ आणखी काही जण वादग्रस्त बोलले आहेत, प्रसाद लाड, रावसाहेब दानवे, हे बोलले आहेत. यांच धाडस तरी कसं होतं. महाराष्ट्र बंद हा नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून भाजपा, शिंदे गटाने बंदमध्ये सहभागी व्हायला हवं होतं, अशी भावना छत्रपती संभाजी राजेंनी व्यक्त केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhatrapati sambhaji raje criticizes shinde fadnavis for not removing governor bhagat singh koshyari from the post of governor kjp dpj