पुणे : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५ वर्षे पूर्ण केल्याने राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने मोदी यांचा राजीनामा घेण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे रहिवासी आहेत. त्यामुळे ‘ रेशीम बागेचे’ वारे हे त्यांच्या कानावर लवकर येतात. तेथून त्यांना मोदी यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याचे संकेत आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडत आहे.’ असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले यावेळी उपस्थित होते. पत्रकारसंघात झालेल्या या वार्तालापाच्या कार्यक्रमात सपकाळ यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य करत आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली. तसेच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता ते निवृत्ती घेतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मोदी यांनी निवृत्ती घेतल्यानंतर पुढील भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्या पद्धतीने सध्या वागत आहेत. ते लक्षात घेता मोदी यांच्यानंतर आता आपणच पंतप्रधान आहोत, असे स्वप्न फडणवीस यांना पडत आहे.’ असेही सपकाळ म्हणाले.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दोन राष्ट्रीय शेठ आहेत. या शेठ लोकांना मोदी यांनी गडगंज केले आहे. हे सर्वांनाच माहीत आहे. हीच परंपरा पुढे कायम ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कंबोज या व्यक्तीला गडगंज करत आहेत. जेणेकरून पंतप्रधान पदासाठी जेवढा मसाला लागेल तेवढा जमा करण्याची जबाबदारी त्याच्याकडे देण्यात आली आहे.’ अशी टीका सपकाळ यांनी केली.

‘दिल्लीश्वराच्या आदेशाने मुंबई अदाणीच्या घशामध्ये टाकल्यानंतर उर्वरित मुंबई ही कंबोज यांना देण्याची प्रक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरू केली आहे.’ असा आरोप सपकाळ यांनी केला.

‘देवेंद्र फडणवीस २०१४ ते २०१९ या काळात मुख्यमंत्री असताना त्यांची चांगली प्रतिमा होती. मात्र सध्या ते कोणाचेही ऐकून घेत नसले तरी तेव्हाची प्रतिमा त्यांच्या कामी येत आहे. महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा लागू केली. हे दाखवून त्यांना हिंदी भाषिक प्रांतांमध्ये आपली प्रतिमा वाढून घ्यायची आहे. त्यामुळे हिंदी भाषेची सक्ती केली जात आहे. सध्या मुख्यमंत्री फडणवीस यांचा बोलताना अविर्भाव आणि इतर गोष्टी बघितल्यानंतर त्यांना रात्रीच नाही तर दिवसादेखील पंतप्रधान बनण्याची स्वप्न पडू लागली आहेत,’ असेही सपकाळ म्हणाले.