पुणे : गणेशोत्सवानंतर अवघ्या दहा दिवसांनंतर टिळक रस्त्यावर पुन्हा एकदा तरुणाईची गर्दी उसळली होती. बुधवारी सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत टिळक रस्त्यासह स. प. महाविद्यालयाचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. निमित्त होते ते केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेल्या ड्रोन लाईट शो कार्यक्रमाचे !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर ‘ड्रोन लाईट शो’ चे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय नागरी विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात आला.
अयोध्या, वाराणसीनंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच आणि तेदेखील पुण्यात अशा पद्धतीचा ‘ड्रोन लाईट शो’चे नियोजन पुण्यात केले गेले. ‘ड्रोन लाईट शो’ पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. अबालवृद्धांचा यामध्ये समावेश होता. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी हा ड्रोन लाईट शो आयोजित करण्यात आला होता. मात्र, पावसाचे सावट असल्याने हा कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलून बुधवारी घेण्यात आला.
सायंकाळी आठ वाजता हा कार्यक्रम सुरू होऊन हजारो ड्रोन आकाशात उडणार होते. हे दृश्य पाहण्यासाठी सहा वाजल्यापासूनच टिळक रस्त्यावर गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. आठ वाजेपर्यंत हजारो नागरिकांनी स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर उपस्थिती लावली होती. सुमारे अर्धा तास हा शो सुरू होता.
‘ड्रोन लाईट शो’ मध्ये संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज, भारताचा नकाशा, छत्रपती शिवाजी महाराज, कॉमन मॅन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह विविध महापुरुष, समाजसुधारक, मातोश्री हिराबेन यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, चंद्रावर उतरलेले चांद्रयान, ऑपरेशन सिंदूर, कलम ३७०, आत्मनिर्भर भारत, तीन अब्ज डॉलर अर्थव्यवस्था अशा विविध रचना, ‘ग्यारा साल बेमिसाल’ स्वच्छ भारत, राममंदिर अशा अनेक रचना दाखविण्यात आल्या.
वाहतुकीची कोंडी अन् कर्णकर्कश हॉर्न
‘ड्रोन लाईट शो’ बघण्यासाठी शहरासह पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या परिसरातून नागरिक आले होते. अनेक नागरिकांनी टिळक रस्त्याच्या आजूबाजूच्या परिसरात वाहने पार्किंग केली होती. तर काही उत्साही तरुणांनी थेट महाविद्यालयाच्या आवारात वाहने लावली होती. हा कार्यक्रम संपल्यानंतर टिळक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी तयार झाली होती. नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, यासाठी पोलिसांनी वाहतूक थांबविली होती. वाहतूक कोंडीतून मार्ग करताना नागरिकांना कसरत करावी लागत होती. कर्णकर्कश हॉर्नचे आवाज ऐकण्यास मिळत होते.