पुणे/ इंदापूर: आगामी विधानसभा निवडणुकीत इंदापूरची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता असल्याने इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याची चर्चेने जोर धरला असला तरी, पाटील यांचा संभाव्य पक्षप्रवेश सोपा नसल्याचे दिसून येत आहे. पवार यांच्या गटात असलेल्या इच्छुक उमेदवारांना डावलून पाटील यांना उमेदवारी देण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे अनेक ताकदवान उमेदवार आहेत. लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघातून पंचवीस हजारांचे मताधिक्य मिळाल्याने या मतदारसंघात पवार यांची ताकद असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या मतदार संघात इंदापूर महापालिकेचे नगराध्यक्ष, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव, अर्बन बँकेचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केलेले शहा कुटुंबातील मुकुंद शहा, भरत शहा, माजी नगराध्यक्षा अंकिता शहा या शरद पवार गटात आहेत. सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे हेदेखील उमेदवारीच्या शर्यतीमध्ये आहेत. पवार गटाकडे असलेले हे संभाव्य उमेदवार पाहता पाटील यांचा पक्षप्रवेश होईल आणि त्यांना उमेदवारी मिळेल, याची शक्यता कमी असल्याो बोलले जाते.

हेही वाचा >>>पुण्यात गरीब रुग्णांवर खासगी रुग्णालयात मोफत उपचार? माहिती अधिकारात आलं वास्तव समोर…

इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास हर्षवर्धन पाटील इच्छुक आहेत. मात्र हा मतदारसंघ महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंदापूरमधून अपक्ष निवडणूक लढवावी, असा दबाव पाटील समर्थकांकडून टाकला जात आहे. त्यासाठी ‘इंदापूर विकास आघाडी’ची स्थापनाही करण्यात आली आहे. मात्र काही दिवसांपासून पाटील हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा इंदापूर तालुक्यात सुरू झाली. त्यातच पवार आणि हर्षवर्धन भेट झाली. पाटील यांनी ही भेट राजकीय नसल्याचे स्पष्टीकरण दिले असले तरी, त्याची चर्चा सुरू झाली आहे. पण, पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश फारसा सोपा नाही. ते केवळ दबावतंत्राचा वापर करत असल्याचेही बोलले जात आहे.

सन २०१४ च्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर गेल्या निवडणुकीपूर्वी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र गेल्या पाच वर्षांपासून ते भाजपमध्ये सक्रिय असून भाजपने त्यांना राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्षपद दिले आहे. हे पद मोठे असल्याने पाटील भाजप सोडण्याचा विचार करणार नाहीत, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.