पिंपरी : मी नात्यागोत्याचे राजकारण कधीही केले नाही. यापुढेही करणार नाही. मावळ लोकसभा मतदारसंघातील नागरिक त्रस्त असून महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात तीव्र नाराजी आहे. मतदारांचा मला मोठा प्रतिसाद मिळत आहे. किमान पावणेचार लाख मतांनी मी विजयी होईल, असा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी केला. तसेच निवडून आल्यानंतर भाजपमध्ये जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. महाविकास आघाडीची बुधवारी (१७ एप्रिल) आकुर्डीत पत्रकार परिषद झाले. यावेळी ते बोलत होते. ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, आपच्या शहराध्यक्षा मीना जावळे, प्रचार प्रमुख योगेश बाबर, मारुती भापकर यावेळी उपस्थित होते.

वाघेरे म्हणाले की, संविधान बदलण्याचा घाट भाजपने घातला आहे. भाजपने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. मावळ मतदारसंघातही एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. नियोजनबद्ध प्रभागनिहाय प्रचार सुरू आहे. सर्व जातीधर्मातील लोक माझा भाऊ, बहीण आहे. मी नात्यागोत्याचे राजकारण कधीही केले नाही. यापुढेही करणार नाही. मतदारसंघातील नागरिक त्रस्त असून महायुतीच्या विरोधाच्या उमेदवाराच्या विरोधात तीव्र नाराजी आहे.जनता सुज्ञ आहे. मतदारांचा मला मोठा प्रतिसाद मिळत आहे. किमान पावणेचार लाख मतांनी मी विजयी होईल. बारणे हे मतदारसंघातील मतदाराला ओळखत नसतील तर त्यांची कीव येते. त्यांना अहंकार जडला आहे. दहा वर्षात मतदारसंघात एकही नवीन प्रकल्प आला नाही. मतदारसंघात औद्योगिक पट्टा मोठा असून कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे. पर्यटनाला चालना दिली नाही. पाणी, रस्ते, वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न आहे. रेल्वेच्या फेऱ्या वाढविल्या पाहिजेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळाला पाहिजे. पवना नदी स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले असून या मुद्यावर निवडणूक लढविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शहराच्या विकासात आमचे मोठे योगदान आहे. माझे वडील, मी महापौर म्हणून काम केले आहे. माझी पत्नी पंधरा वर्षे नगरसेविका आहे. त्यामुळे बारणे यांचा अभ्यास कमी आहे, असा टोलाही त्यांनी लगाविला.

हेही वाचा : तंत्रशिक्षण संस्थांतील अध्यापनात आता स्थानिक भाषेचा अधिकाधिक वापर… काय आहे महत्त्वाचा निर्णय?

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी विजयानंतर भाजपमध्ये जाणार नाहीत याबाबत वचन देण्याची मागणी वाघेरे यांच्याकडे केली. त्यावर मी कोणतीही भूमिका बदलणार नाही. आहे तिथेच राहणार अशी ग्वाही वाघेरे यांनी दिली. काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम म्हणाले की, भाजप भ्रष्टाचाराने बरबटला आहे. पिंपरी पालिकेतील भाजपच्या स्थायी समिती अध्यक्षाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते.

२३ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार

उमेदवारी अर्ज २३ एप्रिल रोजी भरला जाणार आहे. यासाठी माजी मंत्री, आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, मनोहर भोईर उपस्थित राहणार असल्याचे वाघेरे यांनी सांगितले.

हेही वाचा :बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची गैरहजेरी

महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिका-यांची गैरहजेरी दिसली. पक्षाचा एकही पदाधिकारी पत्रकार परिषदेकडे फिरकला नाही. शहराध्यक्ष तुषार कामठे हे बारामती मतदारसंघात प्रचार करत असल्याचे सांगण्यात आले.