पुणे : पुणे ते दौंड दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मार्गातील अडथळे दूर होत नसल्याचे चित्र आहे. दौंड जंक्शनचा पुणे विभागात समावेश करण्यात आला असला तरी पुणे-दौंड लोकल सुरू करण्याचा प्रस्ताव अद्याप रेल्वे मंडळाकडे धूळखात पडून आहे. त्यातच पुणे ते दौंड दरम्यानच्या गाड्या हडपसरपर्यंत धावत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

पुणे ते दौंड दरम्यानची रेल्वे सेवा लोकल म्हणजेच उपनगरी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्यालयाने याबाबतचा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे पाठविला आहे. या प्रस्तावावर रेल्वे मंडळाकडून विचार सुरू आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास या मार्गावर डिझेल मल्टिपल युनिटऐवजी (डेमू) इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (एमू) गाड्या धावणार आहेत. डेमू गाड्या या दहा डब्यांच्या असतात. त्याच वेळी एमू गाड्यांना प्रत्येकी चार डब्यांचे किमान तीन युनिट असतात. त्यामुळे या मार्गावर किमान १२ डब्यांच्या गाड्या धावू शकतील. मात्र, या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.

हेही वाचा : पुण्यात हलकापाऊस; दुचाकी घसरण्याच्या घटना

रेल्वे प्रवासी ग्रुपचे (केडगाव) दिलीप होळकर म्हणाले की, दौंड-पुणे मार्गावरील अनेक गाड्या सध्या हडपसरपर्यंत धावत आहेत. दौंडहून सकाळी सुटणारी गाडी ही अनेक नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीची आहे. मात्र, गेल्या वर्षीपासून ती हडपसर स्थानकापर्यंत धावत आहे. हडपसर स्थानकातून या प्रवाशांना पुण्यात पोहोचण्यासाठी इतर वाहतूक पर्यायांचा वापर करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ जाण्यासोबत त्यांना आर्थिक भुर्दंडही बसत आहे. त्यामुळे किमान दौंडहून सकाळी सुटणारी गाडी पुणे स्थानकापर्यंत सोडावी.

हेही वाचा : देशातील बियाणे उद्योगाची स्थिती काय? जाणून घ्या. बियाणे उद्योगाची उलाढाल

“नागरिकांची सुविधा आणि सुरक्षित रेल्वेप्रवास याला रेल्वे प्रशासनाचे प्राधान्य असायला हवे. केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांना विनंती आहे की, कृपया नागरिकांची सोय लक्षात घेता या दौंडहून येणाऱ्या गाड्या हडपसरपासून पुढे पुणे स्थानकापर्यंत नेण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला द्याव्यात.” – सुप्रिया सुळे, खासदार

हेही वाचा : पवना नदी देशातील सर्वाधिक प्रदूषित; ‘हे’ आहे कारण

“दौंड-पुणे लोकल सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे गेल्या वर्षी पाठविण्यात आला. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. दौंडहून येणाऱ्या गाड्या हडपसरऐवजी पुणे स्थानकापर्यंत सोडाव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे. त्यावर रेल्वे प्रशासनाचा विचार सुरू आहे.” – डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे