पुणे : बारामतीमध्ये तुमच्या मनातील उमेदवार असेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी नुकतेच पुण्यामध्ये केले होते. त्यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘बारामतीमध्ये मी तिकिट मागितले असून लढणार आहे. मग दुसऱ्यांच्या घरामध्ये मी कशाला डोकावू?’, असा सवाल गुरुवारी उपस्थित केला. ‘दादा माझ्यासाठी प्रचार करत होता तेव्हा मी माझ्या मोठ्या भावाला इतके कष्ट दिले नाहीत’, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

हेही वाचा : “बारामतीची जागा महायुती जिंकणारच!”, आमदार गोपीचंद पडळकरांना विश्वास

बारामती लोकसभा मतदारसंघाची लोकप्रतिनिधी म्हणून गेली १५ वर्षे मी काम करत आहे. मी सहा महिन्यांपूर्वीच तिकिटासाठी विनंती पक्षासह महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीकडे केली होती. माझ्या कामगिरीवरून तिकिट मिळेल याचा विश्वास आहे, असे सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भारतीय जनता पक्षाला विकासासाठी नाही तर शरद पवार यांना संपविण्यासाठी निवडणूक लढवायची आहे. त्यांना बेरोजगारी हटवायची नाही, महागाई कमी करायची नाही. भाजप सूडाचे राजकारण करत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. माझ्या सगळ्यांशी गाठीभेटी होतात. त्यासाठी मला निवडणूक असण्याची गरज वाटत नाही. मी २४ तास आणि ३६५ दिवस लोकांमध्येच असते. मला ऊर्जा आणि आनंद लोकांमधूनच मिळतो, असे सुळे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांचे बंड झाले थंड… ‘वर्षा’वर काय घडले?

छत्रपतींच्या गादीचा मानसन्मान केवळ या राज्यातच नाही तर देशात होतो. उदयनराजे आणि आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. आमच्या एका सहकाऱ्याचा आणि त्या गादीचा अपमान होतो, याच्या वेदना होतात, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांच्या तिकिट जाहीर करण्याच्या विलंबासंदर्भात सुळे यांनी केली. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये शरद पवार यांच्या शेजारची खुर्ची उदयनराजे यांची असायची. वैयक्तिक नाती जपण्याचे संस्कार आईनेच माझ्यावर केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.