पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही ठिकाणी ६ नोव्हेंबरपर्यंत हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. ६ ते ८ नोव्हेंबरनंतर हवामान कोरडे होऊन थंडीची चाहूल लागण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे.

मोसमी वारे माघारी जातानाच्या काळात राज्यभरात पाऊस पडला. त्यानंतर अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र, तसेच बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गेल्या काही दिवसांत राज्यभरात पाऊस पडला. दिवाळीच्या काळातही ढगाळ वातावरण, काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली. त्यामुळे पावसाळा लांबल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात अद्यापही कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकणात हलक्या सरी पडत आहेत. नोव्हेंबर महिना सुरू होऊनही ढगाळ वातावरण, पावसाच्या हलक्या सरी पडत असल्याने थंडीची चाहूल लागलेली नाही. हवामान विभागानेही नोव्हेंबरमध्ये पावसाची शक्यता वर्तवत, थंडीचे प्रमाण कमीच राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ अनुपम कश्यपी म्हणाले, ईशान्य अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा पूर्व-ईशान्येकडे सरकत गुजरात, उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने जात आहे. हा कमी दाबाचा पट्टा कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात विशेषत: सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर जिल्ह्यात ४ आणि ५ नोव्गेंबरदरम्यान पावसाची शक्यता आहे. तर ६ नोव्हेंबरपासून राज्यात पावसाची शक्यता नाही. ६ नोव्हेंबरनंतर हवामान कोरडे होऊन थंडीची चाहूल लागू शकते. तसेच उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह वाढू शकतो. त्यामुळे किमान तापमानात घट होऊन हवामानात गारवा निर्माण होऊ शकतो.

राज्यातील पावसाळी वातावरण निवळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, राज्यातील १७ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. त्यात प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीगर, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत वातावरण ढगाळ राहू शकते. त्यानंतर काही दिवसांसाठी पावसाळी वातावरण निवळण्याची शक्यता जाणवते. ८ नोव्हेंबरच्या सुमारास थंडीची चाहूल लागण्याची शक्यता आहे. मात्र, नोव्हेंबरमध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पाऊसही पडू शकतो, तसेच अतिजोरदार थंडीची शक्यता जाणवत नाही, असे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.