पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज, मंगळवारी ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मानित केले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमाला पंतप्रधानांसह व्यासपीठावर उपस्थित असतील. तर मणिपूर प्रश्नावरून पंतप्रधानांना जाब विचारण्यासाठी होणाऱ्या आंदोलनात राष्ट्रवादी सहभागी होणार आहे. त्यामुळे पवार मोदींच्या कार्यक्रमात आणि कार्यकर्ते आंदोलनात असे चित्र असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुमारे दीड वर्षांनंतर पंतप्रधान पुण्यात येणार असून पुरस्कार सोहळय़ाबरोबरच विविध विकासकामांचे उद्घाटन अथवा पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आरती करून पंतप्रधानांचा पुणे दौरा सुरू होईल. त्यानंतर ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारतील. पुणे मेट्रो टप्पा १ च्या फुगेवाडी ते दिवाणी न्यायालय व गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल क्लिनिक या दोन मार्गिकांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारलेली १२८० हून अधिक घरे, तर पुणे महापालिकेने बांधलेली २६५० हून अधिक घरे हस्तांतरित केली जातील.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवडमधील ११९० घरे आणि पुण्यातील ६४०० हून अधिक घरांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. दुसरीकडे, मणिपूरमधील हिंसाचारावरून पंतप्रधानांच्या विरोधात ‘इंडिया फ्रंट पुणे’च्या वतीने काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात येणार आहेत. ९३ वर्षांचे डॉ. बाबा आढाव या आंदोलनाचे नेतृत्व करणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

व्यासपीठावर कोण?

सत्कारमूर्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक, विश्वस्त रोहित टिळक, प्रणती टिळक आणि गिताली मोने-टिळक

दौऱ्याचा कार्यक्रम

  • सकाळी १०.१५ : लोहगाव विमानतळावर आगमन
  • १०.४०  :  हेलिकॉप्टरने पुण्यात आगमन
  • १०.५५ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन, आरती
  • ११ .४५ : लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळा
  • दुपारी १२.४५ : विकासकामांचे उद्घाटन
  • १.४५ ते २.१५ : राखीव वेळ
  • २.५५ : दिल्लीकडे प्रस्थान
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokmanya tilak award to narendra modi today sharad pawar presence ysh