पुणे/बारामती : विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी १६३ जागांवरील अपक्ष उमेदवारांना निवडणुकीसाठी ‘पिपाणी’ चिन्ह देऊन भाजप रडीचा डाव खेळत आहे. निवडणूक आयोगाने चिन्हाच्या नावामध्ये अपेक्षित बदल न केल्यामुळे साताऱ्यामध्ये युतीचा उमेदवार विजयी झाला, याची कबुली स्वत: अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे भाजप रडीचा डाव खेळत असल्याचे स्पष्ट होत आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. सुळे यांनी बारामती येथे पत्रकारांशी बोलताना ही टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील सत्तास्थापनेबाबत उद्योगपती गौतम अदानी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेत्यांची २०१९ मध्ये बैठक झाली होती, असा दावा काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी केला होता. त्यानंतर त्यावरून त्यांनी घूमजाव केले होते. तर, देवेंद्र फडणवीस यांनीही अदानी या बैठकीला उपस्थित होते, असे स्पष्ट केले होते. त्यासंदर्भात विचारले असता त्या म्हणाल्या की, या बैठकीला अदानी होते की नाही, याची कल्पना नाही. अजित पवार कधी हो म्हणतात तर कधी नाही म्हणातात. त्यामुळे हा प्रश्न अजित पवार यांनाच विचारणे योग्य राहील. तेच त्याचे उत्तर देऊ शकतील, असे खासदार सुळे म्हणाल्या.

हेही वाचा – निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच जिल्ह्यांतील ३४ हजार सराइतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई

हेही वाचा – मुख्यमंत्री कोण, याचा अंदाज बांधणे अशक्य; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मत

टीका करून महागाईचा प्रश्न सुटणार का?

शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाइन होत नाही, याची कल्पना आहे. त्यामुळेच भाजप त्यांच्यावर टीका करत आहे. मात्र, पवार यांच्यावर टीका करून महागाईचा प्रश्न सुटणार नाही. भाजपकडे सांगण्यासारखे काही नाही, त्यामुळे ते पवार यांच्यावर टीका करत आहेत. बारामतीमध्ये दादा कोण, हे बारामतीची जनता ठरवेल, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha elections 2024 pipani sign supriya sule comment on bjp ssb