पुणे : शैक्षणिक संस्थांमध्ये पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी कोणतीही अडचण नाही. राज्य सरकार वसतिगृह, प्रयोगशाळा निर्मितीसाठी खर्च करत आहे. केंद्र सरकारने राज्याला ३५० कोटी रुपये दिले. त्यातून ४२ तंत्रनिकेतन, ८ शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये नवोपक्रम केंद्राची (इनोव्हेशन सेंटर) स्थापना करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक महाविद्यालयाला सुमारे ८ कोटी रुपये देण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘डीईएस पुणे विद्यापीठा’च्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री पाटील बोलत होते. या वेळी डीईएसचे अध्यक्ष प्रमोद रावत, डीईएस पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र आचार्य, डीईएसचे उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, डीईएस संस्थेचे कार्यवाह प्रा. डॉ. आनंद काटीकर, डीईएस पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राजेश इंगळे या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

पाटील म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार शिक्षणाला स्वायत्त करण्याचे धोरण स्वीकारले आहे. तसेच नवीन विद्यापीठे स्थापन करण्यात आली आहेत, महाविद्यालयांना स्वायत्तता देण्यात आली आहे. या माध्यमातून जगासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. जर्मनी आणि जपान या देशांना मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारशी करार केला आहे. ही कौशल्य असणारी नवी पिढी भारतात निर्माण होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी खासगी विद्यापीठांनी पुढाकार घेऊन, रोजगाराभिमुख पिढी निर्माण करण्याची जबाबदारी उचलावी. डीईएस पुणे विद्यापीठाला नवीन इमारत, प्रयोगशाळा, कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल.’

विद्यापीठाच्या स्थापनेनंतर पहिल्याच वर्षी १४०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. यंदा तर सर्व जागांवर प्रवेश झाले. भारतीय ज्ञान परंपरा, जैवविज्ञान, डिजिटल सायबर या तीन क्षेत्रांवर विद्यापीठाचा भर आहे. त्यानुसार जैवविज्ञानाच्या क्षेत्रात मोठे संशोधन प्रकल्प राबवण्यात येत आहेत. भारतीय ज्ञान परंपरेचे केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. येत्या काळात स्कूल ऑफ एज्युकेशनअंतर्गत निवासी शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रम, इन्क्युबेशन सेंटर अशा अनेक कल्पना राबवल्या जाणार आहेत, असे डॉ. आचार्य यांनी सांगितले.