पिंपरी : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य शासनाने जारी केलेल्या मसुद्याचे सगेसोयऱ्यांच्या व्याखेसह कायद्यात रूपांतर करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे- पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या १४ फेब्रुवारी पिंपरी-चिंचवड बंदची हाक देण्यात आली आहे.मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने शहरात दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी जरांगे पाटील विविध आंदोलने करत आहेत. जानेवारीत लाखो सहकाऱ्यांसह जरांगे मुंबईच्या दिशेने धडकले होते. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या होत्या. त्यामुळे जरांगे यांनी आंदोलन स्थगित केले होते. मसुद्याचे सगेसोय-यांच्या व्याखेसह कायद्यात रूपांतर करणे, अंतरवली सराटीसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, मराठा समाजास दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी. राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे या मागणीसाठी जरांगे हे गेल्या चार दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून‌ १४ फेब्रुवारी बंदची हाक दिली आहे. शहर बंद ठेवून शांततेत पाठिंबा देण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाने केले आहे.

हेही वाचा…पुणे : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ओला, उबरकडून केराची टोपली! कॅबचालक बेमुदत बंदच्या तयारीत

सकल मराठा समाज पिंपरी-चिंचवड शहर व मावळ तालुक्याच्या वतीने भव्य दुचाकी व चार चाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीची सुरुवात सकाळी नऊ वाजता डांगे चौक थेरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे. तेथून काळेवाडी फाटा, जगताप डेअरी,रहाटणी, पिंपरीगाव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे जाणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर रॅली चिंचवड स्टेशन,आकुर्डी,भक्ती-शक्ती समूह शिल्प निगडीकडे जाणार आहे. तेथून रॅली तळेगाव दाभाडे मार्गे वडगावकडे जाणार आहे. छत्रपती संभाजी महाराज चौक वडगाव मावळ येथे रॅलीचा समारोप होणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चकडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha reservation supporters called pimpri chinchwad bandh tomorrow on 14th february pune print news ggy 03 psg