Role of Medha Kulkarni in Pune BJP: पुण्याच्या कोथरूड परिसरात रात्री उशिरापर्यंत कर्णकर्कश आवाजात सुरू असलेला दांडियाचा कार्यक्रम सनदशीर पद्धतीने बंद करण्यासाठी पुढाकार घेतल्याने आणि ते करून दाखविल्याने राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आल्या. ‘पुन्हा एकदा’ म्हणण्याचे कारण असे, की राज्यसभेच्या सदस्य झाल्यापासून पुण्यातील विविध प्रश्नांवर, मुद्द्यांवर मते मांडून कायम चर्चेत राहणे मेधाताईंना नक्कीच जमले आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घालण्याचे धाडस, प्रसंगी स्वपक्षीयांविरोधातील, पण नागरिकांना आपल्याशा वाटतील, अशा घेतलेल्या भूमिका आणि त्यांची समाज माध्यमांसह वेगवेगळ्या माध्यमांतून मांडणी त्यांना या चर्चेच्या केंद्रस्थानी नेते आणि त्याबद्दल आत्तापर्यंत तरी त्यांच्या प्रगतिपुस्तकात एकही लाल शेरा आलेला नाही!
मेधा कुलकर्णी पुणे महापालिकेत नगरसेवक असतानाही विविध मुद्द्यांवर सातत्याने भूमिका मांडत असत. भाजपच्या विचारधारेशी पक्की बांधीलकी असल्याने भूमिका मांडताना त्या या चौकटीबाहेर कधी जात नाहीत, हे त्यांचे वैशिष्ट्य. याच वैशिष्ट्यामुळे अलीकडे प्रसंगी स्वपक्षीय नेत्यांविरोधात भूमिका मांडल्यानंतरही त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई झालेली नाही. अर्थात, ती न होण्यामागे त्यांचा ‘बोलविता नेता’ कोण, याची चर्चा होत राहते, जी राजकारणात साहजिकच. त्यासाठी मग, नितीन गडकरींचे त्यांच्या घरी जाणे किंवा देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:हून त्यांना दूरध्वनी करून राज्यसभेसाठी त्यांचा विचार होत असल्याचे सांगणे, असेही किस्से चर्चांतून फिरत राहतात. यातून हाती काही लागत नाही, हेही खरे.
कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या निर्मितीनंतर २०१४ मध्ये मेधाताई या मतदारसंघातून निवडून आल्या. चांगला लोकसंपर्क असल्याने आमदार असतानाच्या काळात त्या कोथरूडमध्ये सक्रिय होत्या. कोथरूड हा भाजपसाठी ‘सुरक्षित’ मतदारसंघ. पण, त्यामुळे या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची इच्छा असलेलेही अनेक. पुण्याचे माजी महापौर आणि आता पुण्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री असलेले मुरलीधर मोहोळ यांचे मूळ कार्यक्षेत्र कोथरूडच. केंद्रीय पातळीवर राज्यमंत्रिपदाची, प्रदेश पातळीवर पश्चिम महाराष्ट्राची आणि आता तर तमिळनाडूचे निवडणूक सहप्रभारी म्हणून जबाबदारी मिळूनही त्यांचा एक पाय कोथरूडमध्ये असतोच. त्यातच २०१९ मध्ये मूळ कोल्हापूरचे असूनही चंद्रकांत पाटील यांना विधानसभेवर नेण्यासाठी भाजपने त्यांच्यासाठी याच ‘सुरक्षित’ मतदारसंघाची निवड केली.
मेधा कुलकर्णी तेव्हा नाराज झाल्या आणि त्यांची ती नाराजी कधी लपलीही नाही. चंद्रकांत पाटील कोथरूडमधून निवडून आल्यानंतरच्या पहिल्या अडीच वर्षात भाजप सत्तेत नव्हता, पण या काळाचा वापर पाटील यांनी कोथरूडमध्ये त्यांचे संपर्कजाळे विणण्यासाठी केला. साहजिकच कोथरूडमध्ये आता तीन कोन तयार झाले. अर्थात, अशा ‘तिढ्या’तही ‘कोथरूड मतदारसंघ म्हणजे भाजप’ हे समीकरण कधी बिनसले नाही, इतका हा मतदारसंघ भाजपधार्जिणा आहे! म्हणूनच एक केंद्रीय राज्यमंत्री, एक राज्यसभा खासदार आणि एक राज्य मंत्रिमंडळातील मंत्रिपद इतके सारे एकट्या कोथरूडच्याच वाट्याला आहे.
तरीही, भांड्याला भांडे लागणे या म्हणीचे प्राक्तन कोथरूडसाठीही चुकलेले नाही. मोहोळ यांच्या प्राधान्यक्रमातील मानल्या गेलेल्या मोनोरेल प्रकल्पाला मेधाताईंनी जाहीर विरोध केला. बालभारती-पौड रस्ता या मार्गासाठी टेकडी फोडण्यालाही त्यांचा विरोध आहे. एकीकडे विकास आणि दुसरीकडे पर्यावरण अशा पेचात सापडलेल्या पुण्यातील प्रकल्पांबाबत मेधताईंनी पर्यावरणाच्या बाजूने भूमिका घेतलेली दिसते. पण, त्यामुळे भाजपमधील हे अंतर्विरोध अगदी जाहीरपणे प्रकट झाले. भाजप हा ‘शिस्तबद्ध’ पक्ष मानला जातो आणि अंतर्गत विरोध चव्हाट्यावर आणणे हा पक्ष शक्यतो टाळतो. पण, पुण्यात सध्या तरी तसे होताना दिसत नाही. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणानंतर या प्रकरणाशी संबंधित डॉक्टरच्या नातेवाइकांच्या रुग्णालयाची भाजप महिला आघाडीतील काहींनी मोडतोड केली, त्यालाही मेधाताईंनी जाहीर विरोध केला. या संपूर्ण प्रकरणातच त्यांची भूमिका वेगळी राहिली, ज्यावरून भाजपच्या अंतर्गत बैठकीतही खडाखडी झाल्याचे सांगितले जाते. मात्र, हे होऊनही मेधाताईंवर प्रदेश वा केंद्र पातळीवरून कोणतीही कारवाई झाली नाही, हे विशेषत्वाने नमूद करावे लागेल.
सध्या ज्या दांडिया प्रकरणाची चर्चा होते आहे, त्याच्या आधी रामनवमीच्या दिवशीही त्यांनी एका मंडळाच्या कर्णकर्कश आवाजात लावलेल्या अशोभनीय गाण्यांचा त्रास होत असल्याची तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचल्यावर त्यांनी ती गाणी बंद करायला लावली होती (ते मंडळ मोहोळ यांच्या जवळचे मानले जाते, यावरूनही बरीच चर्चा झाली).
गणेशोत्सवादरम्यानही त्यांनी डीजे आणि आवाज मर्यादेबाबत जाहीर भूमिका घेतली. यंदा ‘निर्बंधमुक्त राज्योत्सव’ असूनही त्यांनी हे केले. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र हा भाजपचा राज्यातील हिंदुत्वाचा बालेकिल्ला होताना दिसत असताना आणि त्यानिमित्ताने सण-उत्सवांना गोंगाटी स्वरूप येत असतानाही त्यांनी हे केले आणि त्या हे करत आहेत. पण दुसरीकडे, सारसबाग किंवा पुण्यातील काही मंदिरांबाबत जेव्हा जेव्हा थेटपणे हिंदुत्ववादी भूमिका घ्यायची वेळ आली, तेव्हा मेधाताईच आघाडीवर होत्या, हेही विसरून चालणार नाही. आणि, म्हणूनच मेधाताईंनी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकांकडे वेगळ्या परिप्रेक्ष्यातून पाहावे लागेल.
या सगळ्या भूमिकांच्या अस्तराखाली असलेले काही पापुद्रे उलगडले, की मेधाताईंच्या या भूमिकांबाबत थोडा फार अंदाज येऊ शकेल. मेधाताईंना २०१९ मध्ये कोथरूडमधून तिकीट मिळाले नाही, म्हणून त्या नाराज होत्या, तरी त्या शांत बसून होत्या, असे झाले नाही. भाजपच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी म्हणून त्यांनी फक्त महाराष्ट्रातच नाही, तर अन्य राज्यांतही महिला प्रश्नांवर काम केले. ज्या अन्याय निवारण समितीच्या कामातून त्यांनी भाजपमधील कामाला सुरुवात केली, त्याचे हे मोठे विस्तारित रूप. भाजपमध्ये अशा कामांची केंद्रीय पातळीवरून काटेकोरपणे चाचपणी होत असते. त्यामुळे त्यांना २०२४ मध्ये राज्यसभेवर संधी मिळाली, ती केवळ त्यांची कोथरूडची उमेदवारी न मिळाल्याबद्दलची नाराजी दूर करण्यासाठी नाही, हे आधी समजून घ्यायला हवे. त्यांच्या कोथरूड या कार्यक्षेत्रातच राहणारे, केंद्रात पर्यावरण, मनुष्यबळविकास, माहिती व प्रसारण अशी अत्यंत महत्त्वाची खाती सांभाळलेले प्रकाश जावडेकर यांना राज्यसभेची संधी नाकारल्यानंतर तसाच सुशिक्षित, सुसंस्कृत अशी प्रतिमा असलेला दुसरा मराठी चेहरा मेधाताईंच्या रूपाने भाजपमध्ये पुढे आला आहे, हा काही निव्वळ योगायोग नाही. लोकांमधून निवडून येण्याची क्षमता, महापालिकेत सक्रिय असल्याने शहरी प्रश्नांचा चांगला अभ्यास, चांगले वक्तृत्व, हिंदीवर पकड हेही मेधाताईंसाठी अधिकचे गुण ठरतात.
याशिवाय, पुण्यासारख्या शहरात असा एक वर्ग आहे, जो भाजप विचारधारेला मानतो, पण त्याला भाजपने ‘राष्ट्रवादी’बरोबर गेलेले पटलेले नाही. हा तोच वर्ग आहे, जो शहरातील रस्ते, वाहतूक कोंडी, सण-उत्सवांचे कंठाळी स्वरूप, प्रचंड वाढलेल्या गुन्हेगारीमुळे ‘सुरक्षित शहर’ या लौकिकाला लागलेला बट्टा यावर समाज माध्यमातून व्यक्त होतो आहे. ‘आधी पुणे असे नव्हते’ असा सूर त्यातून व्यक्त होतो आणि त्यातूनच ‘मूळ पुणेकर’ आणि ‘बाहेरून येऊन पुण्याची वाट लावणारे’ असे दोन गट निर्माण झालेलेही दिसतात. या वर्गाला, त्यांच्या त्रास्ततेला मोकळी वाट देणारा ‘आवाज’ हवा आहे, जो अवकाश मेधाताई भरून काढताना दिसतात. तो भरून काढताना त्यांची सुशिक्षित, सुसंस्कृत आणि बदललेल्या पुण्यातील मध्यमवर्गाला साजेशी भूमिका उपयोगी पडते. आता वास्तविक अशा त्रस्त वर्गाचा आवाज होऊन हा अवकाश विरोधी पक्षांनी भरून काढणे अपेक्षित आहे. पण, अंतर्गत संघर्षाने खंगलेली काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे), मनसे या विरोधी पक्षांचे लोकांना भेडसावणाऱ्या या प्रश्नांच्या निमित्ताने अधूनमधूनच दर्शन होते. मग भाजपही विरोधी पक्षांना त्यांचे हे अवकाश मिळू न देता, मुख्य धारेतील माध्यमांपासून समाज माध्यमांपर्यंत तेही आपल्याच पक्षाला मिळेल, याची काळजी घेते.
दांडिया प्रकरण हे त्याचे अलीकडचे उदाहरण. त्यासाठी या प्रकरणाच्या निमित्ताने मूळ पुण्याचे आणि पुण्याबाहेरचे या विषयी प्रश्न विचारल्यावर एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना मेधाताई नुकत्याच काय म्हणाल्या, हे उद्धृत करणे औचित्याचे ठरेल.
त्या म्हणाल्या, ‘बाहेरच्यांचे स्वागत आहेच. पण, इथे आल्यावर पुण्याच्या संस्कृतीशी मिळतेजुळते घ्या, आमची संस्कृती बिघडवू नका.’ त्याच मुलाखतीत एकूण शहरात आणि विशेषत: कोथरूडमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीबद्दल प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘मी एक अशी राजकारणी आहे, जी ‘ग्रे एरिया’तील लोकांचा उपयोग करून न घेता, निवडणूक लढवते. त्यामुळे मला अशा गुन्हेगारी प्रवृत्तींविरोधात बोलायला भीती वाटत नाही.’ त्या पुढे असेही म्हणाल्या, की पुण्यात हे विषय ज्यांच्या-ज्यांच्याकडे असतील, ते गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सांगायचे आहेत. आता हे जे-जे आहेत, ते-ते कोण आहेत, हे सुज्ञास सांगणे नलगे. पुणे वाचविण्यासाठी पक्षविरहित जनआंदोलनही उभारणार, असेही मेधाताई या मुलाखतीत सांगतात. विरोधी पक्षांसाठी असलेला सर्व अवकाश त्या कशा भरतात, याचा हा केवळ एक मासला. बाकी वेगळेपण किंवा मतभेद अशा दोन्ही अर्थांनी भाजपमध्ये खरोखरच मेधाताई विथ ‘डिफरन्स’ आहेत का, याचे अन्वयार्थ ज्याने-त्याने आपापल्या मतांनुसार लावावेतच.
(सिद्धार्थ केळकर लोकसत्ताच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक आहेत)
siddharth.kelkar@expressindia.com