पिंपरी : शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील हे जुने मित्र वीस वर्षांनी एकत्र आले आहेत. घरात पाय घसरून पडल्याने काही दिवसांपासून रुग्णालयात असलेले वळसे पाटील यांनी ‘माझी प्रकृती उत्तम असून लवकरच प्रचारात सक्रिय होणार आहे’ असे जाहीर केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावलेले वळसे-पाटील हे आढळराव यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याने कोल्हे यांच्या अडचणी वाढणार आहेत. वळसे-पाटील आणि शिवाजीराव आढळराव-पाटील हे जवळचे मित्र होते. वळसे- पाटील यांनीच त्यांना आंबेगावच्या राजकारणात आणले आणि भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष केले होते. मात्र, २००४ मध्ये आढळराव यांची राजकीय महत्त्वाकांक्षा जागृत झाली आणि खासदार होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तेव्हा वळसे-पाटील यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी त्यांना देण्यास विरोध केला. त्यावरून त्यांच्यात राजकीय मतभेद निर्माण झाले. त्यामुळे आढळराव यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळवून जिंकून आले.

हेही वाचा…पिंपरी : ७६ हजार मालमत्ताधारकांकडे ७१७ कोटींचा कर थकीत; महापालिकेकडून नोटिसा

राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभूत करण्याची मोठी कामगिरी आढळराव यांनी केली होती. यामुळे वळसे-पाटील यांना मंत्रिपदही गमवावे लागले होते. त्यानंतर वळसे आणि आढळराव यांच्यातील राजकीय संघर्ष वाढतच गेला. आढळराव यांनी मतदारसंघावर मजबूत पकड निर्माण केली. सलग पंधरा वर्षे ते शिवसेनेकडून निवडून आले. लोकसभेला आढळराव आणि विधानसभेला पाटील निवडून येत असल्याने दोघांमध्ये काही समझोता असल्याचीही चर्चा रंगत होती. पण, वळसे यांना विधानसभा निवडणुकीत पाडण्यासाठी आढळरावांनी प्रयत्न केले. त्यासाठी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत आढळरावांच्या पत्नी कल्पना यांनी वळसे पाटलांच्या विरोधात आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र त्या पराभूत झाल्या. वळसेंना आढळरावांना लोकसभेला हरविणे जमत नव्हते आणि आढळरावांना वळसेंना विधानसभेत पराभूत करणे शक्य होत नव्हते. वळसे यांनी एकदाही लोकसभा निवडणूक लढविण्याचे धाडस केले नाही.

शिवसेनेतून आलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली. कोल्हे यांच्या विजयात वळसे यांचा सिंहाचा वाटा राहिला. पक्षातील फुटीनंतर डॉ. कोल्हे शरद पवार यांच्यासोबत राहिले. तर, वळसे पाटील हे अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यामुळे मतदारसंघातील गणिते बदलली. लोकसभा निवडणुकीसाठी आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतले. दोन दशकांनंतर घरवापसी केली. पर्यायाने वळसे पाटील आणि आढळराव हे दोन मित्रही पुन्हा एकत्र आले. आढळराव यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली. पण, वळसे पाटील घरात पाय घसरून पडल्याने काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे आढळराव यांची चिंता वाढली होती. परंतु, आपली प्रकृती व्यवस्थित असून लवकरच प्रचारात सक्रिय होणार असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले. आंबेगाव तालुक्याच्या राजकारणावर एकहाती वर्चस्व असणारे आणि आजूबाजूच्या तालुक्यांमध्येही चांगला जनसंपर्क असणारे दिलीप वळसे पाटील हे पुन्हा महायुतीच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांची बाजू आणखी भक्कम होण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा…पुणे : हडपसर वैदुवाडी परिसरात झोपड्यांना आग

आढळराव पाटील यांच्या विजयाची खात्री

माझी प्रकृती आता अतिशय उत्तम आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्याने मी माझ्या मतदारसंघातील लोकांच्या भेटीसाठी जाणार आहे. प्रचारात सक्रिय होणार आहे. शिरूरमध्ये मागील काही महिन्यांपासून आमचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील निवडून येथील याची मला खात्री वाटते, असे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

हेही वाचा…पिंपरी : अखेर महिनाभरानंतर मावळमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस प्रचारात सक्रिय; प्रत्येक घडामोडीवर अजित पवार, पार्थ पवारांचे लक्ष

कोल्हे यांच्या अडचणी वाढल्या

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागील विजयात वळसे पाटील यांचे मोठे योगदान होते. वळसे रुग्णालयात दाखल असल्याने आंबेगावमधील कोल्हे यांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत होता. परंतु, आता वळसे यांचे प्रचारात सक्रिय होणे कोल्हे यांच्या अडचणीत भर पाडणारे आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp s dilip walse patil going to rejoin campaign after health scare backs shivajirao adhalarao patil patil pune print news ggy 03 psg