पिंपरी : ‘महापालिका निवडणुकीत महायुती व्हावी अशा मुख्यमंत्र्यांच्या सूचना आहेत. महायुती न झाल्यास संकरित (हायब्रीड) युती करून लढले जाईल,’ असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगितले.पिंपरीमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे, माजी आमदार अश्विनी जगताप, माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव यावेळी उपस्थित होते.

संकरित युतीची संकल्पना स्पष्ट करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘पिंपरीतील ३२ पैकी २२ प्रभागांमध्ये युती झाली आणि उर्वरित दहा प्रभागांमध्ये युती झाली नाही, तर तेथे मैत्रीपूर्ण लढत होईल. शक्य नाही, तेथे स्वबळावर लढले जाईल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संपूर्ण युती होणे आवश्यक असते. पण, महापालिका निवडणुकीमध्ये पक्षासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा असतो. त्यामुळे अधिकाधिक ठिकाणी युती आणि उर्वरित ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल.’

‘काम करणाऱ्या, प्रश्नांची जाण असणाऱ्यांना निवडून आणा’

काम करणाऱ्या, शहरातील प्रश्नांची जाण असणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढविण्याची संधी द्यावी. त्यांना निवडून आणावे, अशा सूचनाही मंत्री पाटील यांनी महापालिका निवडणूक प्रमुख, आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे यांना दिल्या.

तीन विधानसभा मतदारसंघात संघटनात्मक दौरा

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघाचा पाटील यांनी दौरा सुरु केला. शुक्रवारी त्यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा संघटनात्मक आढावा घेतला. आज शनिवारी पिंपरी आणि उद्या रविवारी भोसरी मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. यामध्ये महापालिका निवडणुकी बाबतीत अनेक सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

‘रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवा’

शहरातील रस्त्यांवर खड्डे मोठ्या प्रमाणात आहेत. त्याबाबतच्या तक्रारी सर्वाधिक आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात यावे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्यावा. पदपाथ अतिक्रमणमुक्त राहतील, यासाठी सुयोग्य नियोजन करावे, अशा सूचनाही पाटील यांनी दिल्या.

‘वाहतूक नियोजनाचा आराखडा करा’

शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनसंख्या विचारात घेऊन भविष्यात शहरामध्ये वाहतूक कोंडीसारख्या समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी आगामी १५ वर्षांचा विचार करून महापालिकेने नियोजन आराखडा तयार करावा. तत्काळ उपाययोजनांसाठी पोलीस विभागाशी समन्वय साधून वाहतूक नियंत्रक दिवे दुरुस्तीसह इतर उपाय योजण्यास प्राधान्य देण्याचे आदेशही पाटील यांनी दिले.