पिंपरी : मद्यपान करत असताना पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना रविवारी (१७ ऑगस्ट) चिंचवडमधील पूर्णानगर येथे घडली. याप्रकरणी सूरज रामदास घोडे (२५, घरकुल, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आशुतोष सुदाम कदम (२८, घरकुल, चिखली, पुणे), राजा युवराज हजारे (२८, घरकुल, चिखली) आणि शैलेश शाम गायकवाड उर्फ बन्या (३०, थेरगाव) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज त्यांच्या मित्रांसोबत एका हॉटेलमध्ये मद्यपान करत होते. तेव्हा आरोपी तेथे आले. जुन्या भांडणाच्या रागातून आशुतोष याने सूरज यांना ‘मी तुरुंगातून बाहेर आल्यापासून तुला बघतोय, तू जास्त शहाणपणा करतोयस, तुला आता जिवंत सोडत नाही,’ असे म्हणून त्यांच्या कानाखाली मारले. त्यानंतर त्याने टेबलवरील ग्लास आणि मद्याची बाटली उचलून सूरज यांच्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले.

सूरज यांचे मित्र अविनाश, धीरज आणि गणेश यांनी आरोपी आशुतोष याला पकडले असता, राजा याने बाजूच्या टेबलावरील बिअरची बाटली उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी करण्याचा प्रयत्न केला. राजा आणि शैलेश यांनी टेबलवरील दारूच्या बाटल्या आणि ग्लास फिर्यादीवर फेकून मारले. ‘आम्ही इथले भाई आहोत, तुम्ही आम्हाला ओळखत नाही,’ असे म्हणून त्यांनी परिसरात दहशत निर्माण केली. चिखली पोलिस तपास करत आहेत.

उर्सेत पिस्तुलाचा धाक दाखवून तरुणाला लुटले

उर्से ते परंदवडी रोडवर एका तरुणाला अडवून त्याच्याकडील रोख रक्कम असलेले पाकीट पिस्तुलाचा धाक दाखवून लुटण्यात आले.

या प्रकरणात निखिल उत्तम बेरगळ (२०, सोमाटणे फाटा, ता. मावळ) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ऋषिकेश उर्फ शेऱ्या राजू अडागळे (२४, उर्से, ता. मावळ) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल हा रोडवरून पायी जात असताना ऋषिकेशने त्याला अडवले आणि हाताने मारहाण केली. पिस्तुलाचा धाक दाखवून जबरदस्तीने पॅन्टच्या खिशातून एक हजार रुपये असलेले पाकीट काढून घेतले. शिवीगाळ करित दमदाटी केली. त्याच वेळी निखिलच्या मदतीला येणाऱ्या लोकांनाही पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत निर्माण केली. शिरगाव पोलीस तपास करित आहेत.

कर्ज देण्याच्या नावाखाली फसवणूक

कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली एका व्यक्तीची दोन लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना च-होली बुद्रुक येथे घडली.

या प्रकरणात ३६ वर्षीय युवकाने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या सांगण्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने त्याला रोख आणि ऑनलाइन दोन लाख ८१ हजार ५०० रुपये दिले. आरोपीने पैसे परत न करता आणि कर्ज मंजूर न करता फिर्यादीचा विश्वासघात केला आणि त्यांची आर्थिक फसवणूक केली. तसेच, आरोपीने फिर्यादीला ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची आणि ठार मारण्याची धमकी दिली. दिघी पोलीस तपास करत आहेत.

चिंचवडमध्ये कामगारांवर कोयत्याने हल्ला

कंपनीत काम करत असताना किरकोळ कारणावरून कामगारांना मारहाण करून कोयत्याने हल्ला केल्याची ही घटना चिंचवड येथे घडली.

या प्रकरणात ३७ वर्षीय व्यक्तीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार जणांविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकाच कंपनीत काम करतात. फिर्यादी पेंटिंगचे आणि आरोपी वॉशिंगचे काम करतात. कंपनीतील लाईट जाऊन परत आल्यावर फिर्यादीने कॉम्प्रेसर चालू केला. तेव्हा आरोपीने फिर्यादीला कॉम्प्रेसर चालू करण्यास सांगितले, परंतु फिर्यादीने “मी कॉम्प्रेसर चालू केलेला आहे,” असे सांगितले. त्यावर आरोपीने ‘तू उलट का बोलतोस’ असे म्हणून फिर्यादीला मारहाण केली. त्याने इतर आरोपींना बोलावून घेतले आणि त्यांनी मिळून फिर्यादीला हाताने मारहाण केली. भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या मित्रांना कोयत्याने हातावर मारून जखमी केले. आरोपींनी फिर्यादीला ठार मारण्याची धमकी दिली. निगडी पोलीस तपास करत आहेत.

निगडीत कोयता बाळगल्याप्रकरणी एकास अटक

कोयता बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई निगडीमधील ओटास्किम येथे करण्यात आली. याबाबत गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस शिपाई सोहेल चिखलकर यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अरमान बंदेनवाज पठाण (१९, ओटास्किम, निगडी) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कोणत्याही परवान्याशिवाय बेकायदा धारदार लोखंडी कोयता जवळ बाळगला. याबाबत माहिती मिळाली असता गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अरमान पठाण याला अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.

तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

तडीपार केलेला आरोपी शहरात वावरताना आढळल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई च-होली येथे केली. याबाबत पोलीस शिपाई नारायण सूर्यवंशी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी श्रीधर केशव कदम (३०, खंडोबाचीवाडी, धानोरे, ता. खेड) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीधर याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ५ ऑगस्ट २०२५ रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. आरोपीने कोणतीही परवानगी न घेता आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवेश केला. तसेच, आरोपीने कोणत्याही परवान्याशिवाय कोयता बेकायदा जवळ बाळगला. आळंदी पोलीस तपास करत आहेत.

भोसरीत पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकास अटक

पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी (१७ ऑगस्ट) भोसरीतील टेल्को रोड येथे करण्यात आली. याबाबत मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलीस शिपाई हर्षद कदम यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अक्षय संजय गुंड (२८, लांडेवाडी, भोसरी) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथे एक तरुण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून ५१ हजार रुपये किमतीचे एक लोखंडी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.