पिंपरी-चिंचवड: मराठवाड्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजाचे अतोनात नुकसान झाले. धाराशिव, बीड, नांदेड आणि लातूर परिसरात शेतकर्‍यांचे पीक आणि जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या नैसर्गिक संकटात सापडलेल्या बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी आता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय पुढे सरसावले आहे.

समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पिंपरी-चिंचवड पोलीसांनी माणुसकीचे दर्शन घडवत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला तब्बल ४३ लाख ९५ हजार रुपयांचा धनादेश दिला आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला. या वेळी पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार हे देखील उपस्थित होते.

या कठीण काळात देवस्थानांसह सर्व स्तरांतून बळीराजाला मदत मिळत असताना, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिलेली ही मदत निश्चितच मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मोठा आधार देणारी आहे. पोलीस दलाने सामाजिक बांधिलकी जपत संवेदनशीलतेचे उत्तम उदाहरण या निमित्ताने घालून दिले आहे.