पुणे : बिहार विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी पटना येथे मेट्रोसेवा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारची धडपड सुरू असून पुणेकरांची तयार असलेली मेट्रो पाटण्याला पाठविण्यात आली असल्याचा आरोप प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी मंगळवारी केला. तसेच ही मेट्रो परत आणली नाही, तर महामेट्रोच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी दिला, तर महामेट्रोने उत्पन्नवाढीसाठी ही जादा असलेली मेट्रो तीन वर्षांसाठी बिहार महामेट्रोला दिल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

आबनावे म्हणाले, ‘भारतीय जनता पक्षाला बिहारची विधानसभा निवडणूक जिंकायची आहे. तेथील मतदारांना खूश करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून पटना येथे मेट्रोचे काम सुरू केले आहे. चाचणी घेण्यासाठी म्हणून त्यांनी पुण्यातील महामेट्रोची एक राखीव मेट्रो राजकीय दबाव टाकून तीन वर्षांसाठी पाटन्याला नेण्यात आली आहे. त्यामुळे या निर्णय पुण्यातील मेट्रो प्रवाशांवर अन्यायकारक आहे.’

पुणे शहरात मेट्रोला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. दररोज १ ते दीड लाख प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत. त्यामुळेच मेट्रो मार्ग विस्तार होणार असल्याने गाड्यांची वारंवारिता वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी म्हणून महामेट्रोने राखीव संच ठेवले आहेत. त्यातीलच एक संच बिहारला पाठवण्यासाठी केंद्र सरकारने महामेट्रो कंपनीवर दबाव आणला आहेच त्याबरोबर पुण्याचे खासदार, आमदार, पालकमंत्री तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नसल्याचेही आबनावे यांनी नमूद केले.

महामेट्रोकडे ३३ मेट्रो आहेत. त्यापैकी २३ मेट्रो दैनंदिन धावत असून दहा मेट्रो अतिरिक्त ठेवण्यात आल्या आहेत. पाटणा महामेट्रोने एक ट्रेन तीन वर्षाच्या भाडेतत्वावर मागितली होती. त्यानुसार १५ कोटी रुपये भाडेकरार करून एक मेट्रो पाटणा महामेट्रो प्रशासनाला देण्यात आली आहे. यामुळे आपल्या महामेट्रोला आर्थिक उत्पन्न मिळेलच त्याचबरोबर आर्थिक तोटा कमी होईल. मेट्रोची अशी देवाण-घेवाण सुरूच असते. – हेमंत सोनवणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो, पुणे.