पुणे : मध्ये रेल्वेच्या पुणे स्थानकावरून ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’निमित्त १ आणि २ ऑक्टोबर रोजी पुणे-नागपूर-पुणे ही विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे. दर वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथील दीक्षाभूमीवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी होते. रेल्वेलाही गर्दी असल्याने मध्य रेल्वेने यंदा नियोजित धावणाऱ्या गाड्यांव्यतिरिक्त पुणे-नागपूर-पुणे ही विशेष गाडी सोडण्याचे नियोजन केले आहे.

गाडी क्रमांक ०१२१५ (पुणे-नागपूर) १ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी पुणे स्थानकावरून नागपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी नागपूर स्थानकात पोहोचेल, तर गाडी क्रमांक ०१२१६ (नागपूर -पुणे) गाडी दोन ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता नागपूर स्थानकावरून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होऊन दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ४ वाजून २० मिनिटांनी पुणे स्थानकात पोहोचेल. रेल्वे विभागाने गर्दीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन केले आहे. तसेच प्रवाशांसाठी विशेष व्यवस्था केली असून, प्रवाशांनी गर्दीची ठिकाणे टाळावीत, असे आवाहन मध्य रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.

विशेष रेल्वे गाडीचा मार्ग

दौंड, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा आणि अजनी या मार्गे पुणे-नागपूर-पुणे ही विशेष रेल्वे धावणार आहे. या गाडीला १८ डबे असून, १६ डब्यांना आरक्षण असणार नाही.