पुणे : ‘पुणे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न सोडविण्यासाठी पुण्यात आणखी पाच पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात येणार आहे. अतिरिक्त एक हजार पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत,’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. पुणे पोलीस आयुक्तालयातील विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात झाले. त्या वेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘पुणे शहराचा विस्तार होत असताना पोलीस दलातही आधुनिक सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. यापूर्वी राज्य शासनाने पुण्यात सात पोलीस ठाण्यांना मंजुरी दिली होती. ही पोलीस ठाणी कार्यान्वित झाली. एकाच वेळी सात पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आता पुन्हा पाच पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. लोहगाव, नऱ्हे, लक्ष्मीनगर (येरवडा), मांजरी (हडपसर), येवलेवाडी (कोंढवा) येथील पाच पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव लवकरच मंजूर केला जाईल. तसेच, शहरात आणखी दोन पोलीस उपायुक्त देण्याची मागणी करण्यात आली आहे.’
‘सीसीटीव्ही प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन दहा वर्षांपूर्वी केले होते. या प्रणालीला आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज नियंत्रण कक्ष जोडणे जाणे आवश्यक होते. या कक्षासह देशातील सर्वाधिक आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे प्रणाली पुण्यात सुरू केली आहे. त्यामुळे वाहतुकीवर प्रभावी नियंत्रणासोबत गुन्हे आणि परिस्थितीचे विश्लेषण अत्याधुनिक ‘एआय’ कॅमेऱ्यांद्वारे होणार आहे. पोलीस दलासमोरील आव्हाने, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन साठ वर्षांनंतर पोलीस दलाचा नवीन आकृतिबंध तयार करण्यात आला आहे,’ असे फडणवीस यांनी सांगितले.
‘पुणे शहराचा विस्तार वाढत असून, पुणे ही ‘फ्युचर सिटी’ आहे. माहिती तंत्रज्ञान, उद्योग, शिक्षणासह विविध क्षेत्रांत आघाडीवर असलेल्या पुण्याची वाढ विचारात घेऊन पुढील दहा वर्षांत मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अशा यंत्रणांना एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. पुण्यातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी एकत्रित काम करावे लागणार आहे,’ असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, अप्पर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अर्चना त्यागी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा या वेळी उपस्थित होते.