पुणे : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बालेवाडी येथे ‘ट्रान्झिट हब’ साकारण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) १० एकर जागेसाठी सहमती दर्शवली आहे. मात्र, त्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएणआरडीए) समन्वयातून निधी उभारून ही जागा विकसित करावी, असा प्रस्ताव विभागीय आयुक्तालयाकडे पाठविण्यात आला आहे.

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील हिंजवडी, वाकड, बालेवाडी भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. बंगळुरूकडून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने लांब पल्ल्यामुळे वाकड येथील जकात नाका येथे थांबतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. विशेषतः हिंजवडी परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पालकमंत्री अजित पवार यांनी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला केल्या होत्या.

त्या पार्श्वभूमीवर पीएमपीने बालेवाडी क्रीडा संकुलाजवळील आगार असलेल्या १० एकर जागेत ‘ट्रान्झिट हब’ साकारण्यासाठी प्रस्तावित केले. याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आणि मुंबईकडून पुणे, सातारा, कोल्हापूर असे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना थांबा मिळावा, संबंधित माल त्या ठिकाणी उतरवून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे तेथून पुढे वाहतूक करावी, या दृष्टीने वाहतुकीचे नियोजन केल्यास कोंडीत पडणारी भर कमी होईल, असा विश्वास पीएमपी महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी केला.

देवरे म्हणाले, ‘महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ट्रान्झिट हबसाठी बालेवाडी येथील जागा उत्तम आहे. त्यामुळे हिंजवडी, म्हाळुंगे, वाकड, बाणेर, बालेवाडी या परिसरातील वाहतूक कोंडी सुटेल. रस्त्यांच्या कडेला थांबवणाऱ्या अवजड वाहनांना स्वतंत्र जागा उपलब्ध होईल. पीएमपी किंवा इतर प्रवाशांसाठी विशेष आगार व्यवस्था उभी करून त्या ठिकाणावरून शहरात सुरळीत वाहतूक करता येणे शक्य होईल. आजूबाजूच्या भागातील नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचेल, या दृष्टीने या जागेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे देण्यात आला आहे.’

‘मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असून, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीए यांनी समन्वयाने निधीची तरतूद करावी. एकत्रित निधी उपलब्ध केल्यास तातडीने काम मार्गी लागण्याची शक्यता आहे,’ असेही देवरे यांनी सांगितले.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत एकाच छताखाली सार्वजनिक, खासगी वाहनांना जागा उपलब्ध व्हावी म्हणून पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील ट्रान्झिट हब महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल. पीएमपी प्रशासनालाही याचा मोठा फायदा होईल, असा मानस आहे. – पंकज देवरे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी