पिंपरी : चाकण औद्योगिक वसाहत परिसरातील कडूस ते आंबेठाण या साडेसहा किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) सुरू असलेले काम प्रगतीपथावर असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानपरिषदेत केला.

चाकण औद्योगिक वसाहत परिसरातील कोरेगाव बुद्रुक ते किवळे दरम्यानचा सहा किलोमीटरचा रस्ता खड्ड्यांमुळे पूर्णपणे खराब झाला आहे. या परिसरातील कडूस ते आंबेठाण या औद्योगिक वसाहतीस जोडणाऱ्या महामार्गाची दूरवस्था झाली आहे. औद्योगिक वसाहतीमधील सर्व रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती, देखभाल करण्याासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, असा प्रश्न विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, परिणय फुके, सदाशिव खोत यांनी विचारला होता. या प्रश्नाला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उत्तर दिले.

‘चाकण औद्योगिक वसाहत परिसरातील कोरेगाव बुद्रुक ते किवळे हा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग दर्जाचा आहे. कडूस ते आंबेठाण या लांबीतील रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून साडेसहा किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम सुरु आहे. उर्वरित रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वेळोवेळी देखभाल व दुरुस्तीची कामे केली जात आहेत. रस्ता वाहतुकीकरिता सुस्थितीत ठेवण्यात येत आहे.’ असे भोसले यांनी स्पष्ट केले.