पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे स्थानकावर शनिवारी एका संशयित प्रवाशाकडे तब्बल ५१ लाख रुपयांची बेहिशोबी रक्कम आढळून आली. या प्रवासी व्यक्तीला रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानांनी ताब्यात घेत अधिक माहितीसाठी प्राप्तिकर विभागाच्या ताब्यात दिले आहे.
आरपीएफने दिलेल्या माहितीनुसार, ‘पुणे रेल्वे स्थानकामध्ये प्रवेश करताना प्रवाशांसोबत असलेल्या साहित्याची आणि पिशव्यांची स्कॅनर मशीनद्वारे नियमित तपासणी करण्यात येते. शनिवारी दुपारी गुजरातच्या मेहसाणा येथील २४ वर्षीय फरदीनखान जफरउल्ला खान मोगल या प्रवाशाच्या दोन पिशव्या स्कॅनर मशीनमध्ये तपासणीसाठी ठेवण्यात आल्या असताना पिशव्यांमध्ये संशयास्पद वस्तू आढळून आल्या.
त्यामुळे या पिशव्यांमधील तपासणी केली असता, जांभळ्या रंगाच्या पिशवीत सुमारे २२ लाख रुपये आणि लाल रंगाच्या बॅगेत सुमारे २९ लाख रुपये, अशी एकूण ५१ लाख रुपयांची रोकड आढळून आली. या रोख पैशांबाबत फरदीनखान या प्रवासी व्यक्तीकडे चौकशी करण्यात आली असता, पैशाची सविस्तर माहिती देऊ न शकल्याने संशय अधिक बळावला.’
त्यामुळे घटनास्थळावरील आरपीएफ निरीक्षक सुनील कुमार यादव, एएसआय प्रदीप चौधरी, एएसआय संतोष जायभाये, एएसआय विलास दराडे, एएसआय संतोष पवार आणि एमएसएफ कर्मचारी कृष्णा भांगे यांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरू केली.
प्राप्तिकर अधिनियम, १९६१ नुसार, बेनामी रोकड बाळगणे उल्लंघन असून फरदीनखान या प्रवाशाची संशयास्पद हालचाल होत असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. आरपीएफच्या वरिष्ठ सुरक्षा आयुक्त प्रियांका शर्मा यांच्या आदेशानुसार अधिक चौकशीसाठी संबंधित रोकड आणि फरदीनखान या प्रवाशाला प्राप्तिकर विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
रेल्वे प्रवास करताना प्राप्तिकर विभागाच्या निर्देशानुसार ठरावीक रकम तसेच मौल्यवान वस्तू सोबत ठेवून प्रवास करू नये. कोणत्याही संशयास्पद हालचालीची माहिती तत्काळ मदत क्रमांक १३९ किंवा जवळच्या आरपीएफच्या केंद्रात द्यावी. प्रवाशांची सुरक्षा आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे मौल्यवान वस्तू प्रवासात सोबत ठेवू नये. – सुनील यादव, आरपीएफ निरीक्षक, पुणे रेल्वे स्थानक.