पुणे : काँग्रेसच्या कार्यकारिणीत केलेल्या मोठ्या बदलांनंतर आता राज्य युवक काँग्रेसमध्येही मोठ्या बदलांचे संकेत आहेत. त्यानुसार युवक काँग्रेसच्या राज्य अध्यक्षपदी नव्या नेतृत्त्वाला संधी देण्यात आली असून, राज्य कार्यकारिणीवरील अन्य पदांची निवड लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
शिवराज मोरे यांच्याकडे आता युवक काँग्रेसच्या राज्य अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही नियुक्ती विरोधी पक्षनेते राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब, भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी आणि बिहार काँग्रेसचे प्रभारी श्रीकृष्ण अलावरु, राष्ट्रीय सरचिटणीस अजय चीकरा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मान्यतेने करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र मोरे यांना देण्यात आले.
शिवराज मोरे हे विद्यार्थी आणि युवक चळवळीतील सक्रीय कार्यकर्ता आहेत. २०१०मध्ये त्यांनी एनएसयूआय महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी २०१० ते २०१४ या कालावधीत दोन वेळा महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांनी एनएसयूआयचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून देशभरात काम केले. एनएसयूआयमधील त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पद देण्यात आले. पुढे ते कार्याध्यक्ष म्हणूनही काम केले. आता त्यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवराज मोरे हे सातारा जिल्ह्यातील कराड येथील सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. शिक्षण, बेरोजगारी, सामाजिक न्याय यांसारख्या मुद्द्यांवर विद्यार्थी आणि तरुणांचे प्रश्न मांडत त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत.
सध्या युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवड करण्यात आली आहे. तसेच राज्य कार्यकारिणातही बरेच बदल अपेक्षित आहेत. येत्या काही दिवसांत त्याबाबतची घोषणा केली जाणार आहे. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून राज्यातील युवकांचे प्रश्न अधिक आक्रमकपणे मांडले जातील, असे युवक काँग्रेसकडून सांगण्यात आले.