पिंपरी : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा एक नगरसेवक बिनविरोध निवडून आला आहे. लोणावळा नगरपरिषदेमध्येही भाजपचा एक नगरसेवक बिनविरोध निवडून आला आहे. या उमेदवारांचे एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित असून अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजपची युती झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस १७ आणि भाजप ११ जागांवर निवडणूक लढवत आहे. तळेगावमध्ये हे दोन्ही पक्षच मुख्य पक्ष आहेत. त्यामुळे चार प्रभागात प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज आले नाहीत. प्रभाग क्रमांक नऊ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या हेमलता खळदे, प्रभाग क्रमांक १३ मधून भाजपचे दीपक भेगडे, शोभा परदेशी आणि प्रभाग क्रमांक एक मधील निखिल भगत यांची बिनविरोध निवड निश्चित असून औपचारिकता आता बाकी आहे. लोणावळा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक सात मधील सर्वसाधारण जागेसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते देविदास कडू यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

‘तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे दीपक भेगडे, शोभा परदेशी आणि निखिल भगत हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपाने खाते खोलले आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात भाजपची विजयाची सुरुवात झाली असल्याचे’, भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार महेश लांडगे यांनी सांगितले. ‘उत्तर पुणे जिल्ह्यातील सात नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतींसाठी भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्ष व सदस्य पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी नुकतेच अर्ज दाखल केले. मावळ, खेड, जुन्नर, शिरुर, हवेली आणि मंचर तालुक्यांमध्ये उमेदवारी प्रक्रियेला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत भारतीय जनता पार्टीचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून येत भाजपाची विजयी घोडदौड सुरु झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘कमळ’ फुलवण्याचा निर्धार केला असल्याचेही’ त्यांनी सांगितले.

आता २४ जागांसाठी निवडणूक

तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत १४ प्रभाग असून २८ नगरसेवक असणार आहेत. एका प्रभागातून दोन नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. मात्र, चार नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता २४ जागांसाठीच निवडणूक होणार आहे. तळेगाव दाभाडेमध्ये ६४ हजार ६७८ मतदार आहेत.  त्यात पुरुष मतदार ३३ हजार ३०१, महिला मतदार ३१ हजार ३७५ आणि इतर मतदार दोन आहेत.

लोणावळ्यात २६ जागांसाठी निवडणूक

लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत १३ प्रभाग असून २७ नगरसेवक आहेत. १२ प्रभागातून दोन आणि एका प्रभागातून तीन नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. लोणावळा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक सात मधील सर्वसाधारण जागेसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते देविदास कडू यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता २६ जागांसाठीच निवडणूक होणार आहे. मतदारसंख्या ४८ हजार ३७३ असून ६३ मतदार केंद्र असणार आहेत.

लोणावळ्यात महायुतीमध्येच लढत

लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), भाजप आणि शिवसेना (शिंदे) या तीन पक्षात निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून राजेंद्र सोनवणे, भाजपकडून माजी नगरसेवक गिरीश कांबळे हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत वाघमारे हे शिवसेनेकडून (शिंदे) नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत.