देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
आज भारत सर्वच क्षेत्रांत यशाची जी नवनवी शिखरे गाठतो आहे, ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे आणि त्यांच्यावरील देशवासीयांच्या विश्वासामुळेच शक्य झाले आहे. वैश्विक नेते असलेले मोदीजी वयाची ७५ वर्षे पूर्ण करत असताना त्यांच्या आजवरच्या मौलिक योगदानाविषयी…
मला अजूनही आठवते, नरेंद्र मोदी यांची पहिली भेट… मी नागपूरचा महापौर होतो आणि भाजयुमोचा अध्यक्ष होतो. रेशीमबागेत एक अभ्यासवर्ग होता. त्याची जबाबदारी माझ्याकडे होती. तिथे मोदीजी आले, आम्ही त्यांचे स्वागत केले. त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्या समाधीचे दर्शन घेतले. या अभ्यासवर्गाला अनेक नेते आले होते. त्यापैकी बहुतेक गेस्टहाऊसमध्ये राहायला गेले. स्वाभाविक मी मोदीजींनाही विचारले, आपण येथे राहणार की गेस्टहाऊसमध्ये, पण मोदीजींनी ठाम नकार दिला. रेशीमबागेतच एका खोलीत ते राहिले. एका सामान्य स्वयंसेवकामध्ये जो व्यवहार असतो, तो मला त्यांच्यात पाहायला मिळाला. नरेंद्र मोदी या व्यक्तीबद्दल माझ्या मनात निर्माण झालेले ते पहिले प्रतिबिंब होते. ते आजही तसेच कोरून ठेवलेले आहे.
आपले वैश्विक नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण करत आहेत, मी त्यांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. भारतमातेच्या सेवेसाठी आई जगदंबेने त्यांना उदंड आयुष्य द्यावे, उत्तम आरोग्य द्यावे, अशी मी प्रार्थना करतो. २०१४ च्या अनागोंदी, भ्रष्टाचाराच्या दलदलीतून बाहेर निघत आज देश जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे दमदार वाटचाल करत आहे. शेजारच्या देशाचे आक्रमण असो की कुण्या देशाने लादलेले आयात शुल्क अशा कोणत्याही संकटाला न डगमगता, ताठ मानेने आणि तितक्याच खंबीरपणे उत्तर देत आहे. कुठल्याही आश्वासक वाटचालीमागे एक नेतृत्व असते. ते देशाला, धोरणांना दिशा देते. या नेतृत्वाचे नाव आहे, नरेंद्र मोदी.
राममंदिर असो, अनुच्छेद ३७० रद्द करणे असो, तिहेरी तलाकवर बंदी असो, गरीब कल्याणाचा मोठा कार्यक्रम असो, सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक किंवा अगदी अलीकडचे ऑपरेशन सिंदूर असो, कामगिरीचे वर्णन करायचे तर जागा अपुरी पडेल. महिला, शेतकरी, युवा, वंचित अशा प्रत्येक घटकासाठी त्यांनी शेकडो निर्णय घेतले. त्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले. २५ कोटी लोक दारिद्य्ररेषेबाहेर येणे, ही सोपी बाब नाही. या ११ वर्षांत तीन कोटी घरे असोत, १५ कोटी घरांना नळ जोडणी असो, १२ कोटी शौचालयांची निर्मिती असो, ६८ लाख पदपथ विक्रेत्यांना पीएम स्वनिधी असो अशा कितीतरी योजना सांगता येतील. फक्त एक आकडा पुरेसा आहे. ४३.८ लाख कोटी रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात आले आहेत. गरीब कल्याणासोबतच देश सुधारणांच्या एका नव्या वाटेवर स्वार झाला आहे. विकसित भारताच्या वाटेवरील सर्वांत महत्त्वाचा भागीदार असलेली नारीशक्ती २०२९ मध्ये ३३ टक्के आरक्षणासह संसद आणि राज्य विधानसभांमध्ये दिसणार आहे. स्टार्टअप, एम्स, आयआयएम, वैद्याकीय महाविद्यालये यांची संख्या सातत्याने वाढली आहे. जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी ४९ टक्के व्यवहार भारतात होता. विमानतळे, रेल्वे, महामार्ग, हरितऊर्जा अशा सर्वच क्षेत्रांत यशाची नवनवी शिखरे आपण गाठतो आहोत. आणि हे सर्व काही होऊ शकले ते केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे आणि त्यांच्यावरील देशवासीयांच्या विश्वासामुळे.
गेली सलग २६ वर्षे ते सांविधानिक पदांवर कार्यरत आहेत. हा लोकसेवेचा, लोककल्याणाचा, सुशासनाचा, नेतृत्व कौशल्याचा, भारतीय मानबिंदू उंचावण्याचा कालखंड अधिक देदीप्यमान झाला, तो त्यांच्या मुळातील स्वयंसेवकत्वामुळे. पूर्णवेळ प्रचारक, संघटनमंत्री असा तळागाळातून प्रवास करीत ते देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. या संपूर्ण प्रवासात त्यांनी कर्मयोग जपला. निर्णय प्रिय आहे की अप्रिय, त्याने टीका होणार की प्रशंसा, याची पर्वा ते कधीच करीत नाहीत. त्यामुळे राष्ट्रहिताशी ते कधीही तडजोड करीत नाहीत. ज्यातून राष्ट्रहित साधले जाणार आहे, तोच निर्णय घेण्याकडे त्यांचा कल असतो. २०१६ चा उरीचा हल्ला असो, २०१९ चा पुलवामा असो की अगदी आताचे पहलगाम, मोदीजींनी कधीच मागे पाहिले नाही. ‘आत्मनिर्भर अभियान’, ‘व्होकल फॉर लोकल’ किंवा संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी उत्पादने यात मोदीजींची किती दूरदृष्टी होती, याचा परिचय आपण घेत आहोत. कोविडच्या काळापासूनच आत्मनिर्भरतेचा पाया रचला गेला, पण असे करताना त्यांनी जगाला लस देण्याचे काम केले. भारत हा विश्वकल्याणासाठी आहे, हे आपले ब्रीद आहे, ते जपण्याचाच प्रयत्न त्यांनी सातत्याने केला.
मला कार्यकर्ता म्हणून अनेक नेत्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली, पण मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदीजींसारख्या ‘गव्हर्नन्स’ माहिती असणाऱ्या नेत्याबरोबर काम करता आले, यासाठी मोठे भाग्य लागते. प्रकल्प कसे मार्गी लावावेत, हे मला मोदीजींकडून शिकता आले. सर्व स्टेकहोल्डर्स एका ठिकाणी असावेत, याची ‘वॉररूम’ संकल्पना मी सुरू केली असली तरी त्यामागे ‘प्रगती’ची संकल्पना आहे. मोदीजी दर आठवड्याला सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांची एक बैठक घेतात. त्याला ‘प्रगती कॉन्फरन्सिंग’ असे नाव आहे. या ‘प्रगती’त एखादा प्रकल्प गेला की, त्याला सर्व परवानग्या झटाझट मिळतात. नवी मुंबईचे विमानतळ या ‘प्रगती’त घ्यावे, हा आग्रह मी त्यांच्याकडे केला आणि त्यांनी तो मान्यही केला. त्यानंतरच या प्रकल्पाच्या कामाला गती आली. एकाच बैठकीत आठ परवानग्या प्राप्त झाल्या. आता लवकरच हे विमानतळ नागरिकांच्या सेवेत दाखल होईल.
मोदीजींच्या प्राधान्यक्रमावर आपल्या महाराष्ट्रातील विषय कायम असतात. इंदू मिलच्या स्मारकासाठी साडेतीन हजार कोटींची जागा एका झटक्यात देणे असो की, पायाभूत सुविधांचे प्रकल्प असतो, ते भक्कमपणे पाठीशी उभे राहतात. मोदीजींनी महाराष्ट्राचा एकही विषय प्रलंबित ठेवलेला नाही. या वर्षी तर ‘प्रधानमंत्री आवास योजने’तील ३० लाख घरे त्यांनी महाराष्ट्राला दिली. आज महाराष्ट्रात १० लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत, यामागे निश्चितपणे मोदीजींचे भक्कम पाठबळ आहे. महाराष्ट्र हे सातत्याने थेट परकीय गुंतवणुकीत (एफडीआय) पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. यामागेसुद्धा मोदीजींचा भक्कम पाठिंबा आहे. वाढवण बंदर असेल, पुण्याचे नवीन विमानतळ, नागपूर विमानतळाचे आधुनिकीकरण, अमरावती विमानतळ, अमरावतीचा टेक्सटाइल पार्क, गडचिरोली पोलाद सिटी, पालखी मार्ग, मेट्रोचे मुंबई, नागपूर, पुण्यातील प्रकल्प, छत्रपती संभाजीनगरमधील डीएमआयसी, ऑरिक सिटी, जलसंधारणाचे प्रकल्प, त्यातही महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांसाठी विशेषत्वाने मिळालेले पॅकेज, जे अन्य कोणत्याही राज्याला मिळालेले नाही, प्रत्येक प्रकल्पात मोदीजी भक्कमपणे पाठीशी उभे राहिले आणि आजही उभे आहेत. आता नदीजोडचा एक मोठा कार्यक्रम आपण हाती घेतो आहोत. त्यातही केंद्र सरकारचा भक्कम पाठिंबा आहेच.
आज ज्या अनेक गोष्टी आपण करत आहोत, त्यात मोदीजींची क्षणाक्षणाला भक्कम साथ आहे. महाराष्ट्रावर त्यांचे विशेष प्रेम आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही त्यांची आस्था आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे संविधान हे त्यांचे प्रमाण आहे, वीर सावरकर हे त्यांचे अधिष्ठान आहे. म्हणून विकासाला ‘विरासत’ची (वारसा आणि परंपरा) जोड देणे, हे त्यांच्या धोरणाचे वैशिष्ट्य आहे. शिवरायांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचे मानांकन मिळाले, त्या प्रत्येक टप्प्याकडे मोदीजींचे बारकाईने लक्ष होते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी अनेकदा मागणी झाली, पण मोदीजींनीच पुढाकार घेतला आणि निर्णय सोपा झाला. खरे तर विकासाचे हे पर्व देशभर आहे, पण अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रात त्याचा वाटा काकणभर अधिकच आहे आणि आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे. मी त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा अतिशय मनापासून शुभेच्छा देतो.