कल्याण : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री आणि या भागाचे खासदार कपील पाटील यांनी मागील दहा वर्षात विकासाची कोणतीही कामे केली नाहीत. जिल्ह्यातील रोजगाराचे केंद्र असलेल्या भिवंडीतील कपडा उद्योग बंद पडला. काही उद्योग गुजरात, अन्य राज्यात स्थलांंतरित झाले तरी खा. पाटील यांनी या उद्योगांच्या पुनर्जिवनासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, अशी टीका भिवंडी लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी रविवारी येथे माध्यमांशी बोलताना केली.

अशीच परिस्थिती कल्याण लोकसभा मतदारसंंघात आहे. येथे फक्त विकासाच्या बाता मारल्या जात आहेत, अशी टीका कल्याण लोकसभेतील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी यावेळी केली. भिवंडी, कल्याण लोकसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांची एकत्रित पत्रकार परिषद कल्याण जिल्हा काँग्रेस समितीचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी कल्याण येथे आयोजित केली होती.

हेही वाचा… ‘त्यांना’ रामभक्त जागा दाखवतील; ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांची टीका

भिवंडीसह राज्याच्या इतर भागातील अनेक कंपन्या गुजरातसह इतर भागात स्थलांतरित होत आहेत. राज्यात भाजपचे सरकार आहे. तरीही कल्याण, भिवंडी लोकसभेतील खासदार यांनी हे उद्योग याच भागात राहावेत म्हणून कोणतेही प्रयत्न केले नाहीत, अशी टीका बाळ्या मामा, वैशाली दरेकर यांनी केली.

भिवंडी परिसरात एकही चांंगला रस्ता नाही. सर्वोपचारी रुग्णालय नाही. लोकांना उपचारासाठी ठाणे, मुंबईत जावे लागते. निवडणुका जवळ आल्या की कपील पाटील फक्त कल्याण-मुरबाड-नगर रेल्वेचा विषय उकरून काढून त्या विषयी चर्चा घडवून आणतात. त्यांच्याकडून या विषयीचा पाठपुरावा होत नसल्याने हा मह्वाचा रेल्वे मार्ग रखडला आहे, अशी टीका बाळ्या मामा यांनी केली. वादळ आला की पालापाचोळा उडून जातो, तसेच चित्र आता भिवंडी लोकसभेत होईल, अशी खोचक टीका बाळ्या मामा यांनी पाटील यांच्यावर केली.

हेही वाचा… ठाणे: चर्चमधील हजारो सदस्यांचा १०० टक्के मतदान करण्याचा निर्णय

भिवंडी ही व्यापाराचे चांगले केंद्र आहे. पण राज्य सरकार येथील कपडा उद्योगासह इतर उद्योगांच्या पुनर्जिवनासाठी कोणतेही अर्थसाहाय्य करण्यास तयार नाही. भिवंडीतील ५० टक्के कपडा व्यवसाय बंंद पडला आहे. त्यामुळे हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. या भागाचे खासदार म्हणून कपील पाटील यांनी काहीही केले नाही, असेे म्हात्रे यांनी सांगितले.

कल्याण लोकसभा हद्दीत पाणी टंचाई, रस्ते, वाहन कोंडी विषय गंभीर आहेत. पण यासाठी खासदार शिंदे यांनी काहीही केलेले नाही. शहरी, ग्रामीण भागाचा समतोल साधून या भागात विकास कामे होणे गरजेचे आहे, याबाबतीत खासदार शिंदे काही केले नाही, अशी टीका दरेकर यांनी केली.

कल्याण भागाेचे नागरीकरण होत आहे. यासाठी स्वतंत्र धरणाची गरज आहे. यावर विचार होत नाही. पालिकेची रुग्णालये मरणासन्न अवस्थेत आहेत. किरकोळ उपचाराचे रुग्ण कळवा, मुंबईत पाठविले जातात. आता कसारा, कर्ज, कल्याण, डोंबिवली ते कळवा मार्गे नवी मुंबईत रेल्वे मार्गाची गरज आहे. याविषयी खासदार शिंदे यांचे मौन आश्चर्यकारक आहे, असे त्या म्हणाल्या.