ThaneTraffic / BJP / ठाणे : अवजड वाहनांमुळे दिवसा होणारी कोंडी रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अवजड वाहने सोडण्याचे आदेश वाहतूक विभागाला दिले असतानाही घोडबंदर येथील गायमुखजवळ काही वाहतूक कर्मचारी अवजड वाहनांना प्रवेश देत आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानंतरही अवजड कोंडी कायम असल्याचा टोला भाजपचे आमदार संजय केळकर यांनी लगावला आहे.

भाजपचे आमदार संजय केळकर यांचा खोपट येथील भाजप कार्यालयात आज, शुक्रवारी झालेल्या जनसेकाचा जनसंवाद या कार्यक्रमात विविध तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात विकासकाने केलेली घरासंदर्भातील फसवणूक, इमारतीच्या ओसी, महानगर गॅस, पाणी, महापालिका वारसा हक्क, पतपेढी फसवणूक, एसआरए, ड्रेनेज लाईन, गृहसंकुलातील अनधिकृत बांधकाम, चिपळूण येथील प्रांत कार्यालयातील विषय, अशा विविध विषयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यासह, वाहतूक कोंडीची देखील समस्या होती.

गेले अनेक दिवसांपासून रस्त्यांवर पडलेले खड्डे, मेट्रो प्रकल्पाची कामे, अवजड वाहनांची वाहतूक यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांची या वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी अवजड वाहनांची वाहतूक दिवसा बंद ठेवायची ही वाहतूक रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंतच सुरु राहिल, असे आदेश वाहतूक विभागाला दिले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानुसार वाहतूक विभागाने अधिसूचना जारी केली. त्यानुसार, ठाणे ते बदलापूरपर्यंत अवजड वाहनांना दिवसा वाहतूक करण्यास बंदी घातली आहे. परंतू, असे आदेश असतानाही घोडबंदर येथील गायमुख जवळ काही कर्मचारी ही वाहने सोडत असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची गरज असल्याचे मत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले.

वाहतूक विभागाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी व्हायला हवी तसेच पुढील काळात कोस्टल रोड, मेट्रो सुरू झाल्यावर वाहतुकीच्या अडचणी दूर होणार आहेत. तर, दिल्ली-मुंबई मार्ग सुरू झाल्यानंतर वसईपुढे ही वाहतूक वळून घोडबंदरकडे येणार नाही. मात्र यासाठी काही कालावधी लागेल. तोपर्यंत यंत्रणांनी सावध राहायला हवे, खड्डे होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी, सेवा रस्ते मोकळे ठेवावेत, वाहतूक नियमन नीट होईल याकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष पुरवावे, असे आवाहन संजय केळकर यांनी केले.