कल्याण : दिवाळी तोंडावर आली आहे. जवाहिऱ्यांच्या दुकानात सोने-नाणे खरेदीसाठी नागरिकांची, व्यापारी, व्यावसायिकांची घाऊक व्यवहार पूर्ण करण्यासाठी बँकामध्ये पुरेशी रक्कम राखून ठेवण्याची तयारी सुरू आहे. यासाठी डोंबिवली, कल्याणमधील काही सहकारी, राष्ट्रीयकृत, कार्पाेरेट बँकांमध्ये गेल्या सात ते आठ दिवसापूर्वी जमा केलेले धनादेश अद्याप वटण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने नागरिक, व्यापारी, व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

दिवाळी सणाच्या काळात नागरिकांकडून अधिक प्रमाणात सोने, नाणे, चांदी दागिने, या धातुच्या वस्तू खरेदी केल्या जातात. अलीकडे सराफांच्या दुकानात दोन लाखाच्या वरील खरेदी केल्यावर ती रक्कम आपल्या बँक खात्यामधून ग्राहकाला ऑनलाईन भरणा करावी लागते. त्याशिवाय व्यवहार पूर्ण होत नाही. त्यामुळे दिवाळी सणाच्या काळात, लक्ष्मी पूजनापूर्वी खरेदी करावे लागणारे ऑनलाईन माध्यमातून शेअर्स, सोने, नाणे, दागिने खरेदी करण्यापूर्वी बँकांमध्ये पुरेशा रकमेची गंगाजळी राखून ठेवावी म्हणून अनेक नागरिकांनी, शेअर्स व्यवसायातील व्यावसायिकांनी बँकांमध्ये गेल्या आठवड्यात विविध बँकांचे धनादेश वटविण्यासाठी जमा केले आहेत. काही व्यावसायिकांचे कोट्यवधीचे रूपयांचे दैनंदिन घाऊक व्यवहार असतात. त्यासाठी त्यांना ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी बँकांमध्ये पुरेशी रोख गंगाजळी ठेवावी लागते. त्यामुळे अशा व्यावसायिकांनी बँकांमध्ये गेल्या आठवड्यात धनादेश जमा केले आहेत.

आता सात दिवस उलटूनही हे धनादेश वटण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. याऊलट बँकांमधून बँकेच्या ऑनलाईन व्यवहारात काही तांत्रिक अडथळे आहेत. त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाईन व्यवहार माध्यमातील युपीआय, आरटीजीएस, एनईएफटी, नेट बँँकिग, मोबाईल बँँकिंग आणि इतर माध्यमांचा वापर करण्याच्या सूचना दिवसांमधून सतत लघुसंदेशाच्या माध्यमातून ग्राहकांना पाठविण्यात येत आहेत. या सततच्या संदेशामुळे ग्राहक त्रस्त आहेत. चार ऑक्टोबरपासून बँकेत जमा केलेला धनादेश त्याच दिवशी काही तासात वटणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने जाहीर केले होते. त्याच्या उलट परिस्थिती काही बँकांमध्ये दिसून येत आहे, अशा तक्रारी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.

धनादेश अद्याप वटला का नाही या विषयावरून डोंबिवली, कल्याण परिसरातील काही सहकारी, नागरी सहकारी, राष्ट्रीयकृत, कार्पोरेट बँकांमध्ये बँक कर्मचारी, ग्राहक यांच्यात वादावादी सुरू असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात कल्याण, डोंबिवलीतील काही स्थानिक बँक अधिकाऱ्यांनी सांगितले, रिझर्व्ह बँकेच्या आदेशाप्रमाणे धनादेश वटणावळीची बँकांमधील सुधारित प्रणाली आणि नॅशनल पेमेंट्स काॅर्पोरेशन ऑफ इंडियाची देयक प्रणाली यांच्या एकात्मीकरणात काही तांत्रिक अडथळे येत आहेत. त्यामुळे धनादेश वटणावळीची समस्या काही बँकांमध्ये निर्माण झाली आहे. या सुधारित प्रणालीचे अनेक बँक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण नाही. अचानक ही प्रणाली राबवावी लागत असल्याने बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. त्यात ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. एकदा ही सुधारित प्रणाली की रूळली की मग ही समस्या कायमची मिटेल.