ठाणे : आज माझ्यासोबत जे काही झाले ते मी कधीही स्विकारेल. कारण मी राजकारण आणि समाजकारणात आहे. धनंजय मुंडे चुकला तर त्याला माफ करु नये. पण तो विषय धनंजय मुंडे पर्यंत हवा. धनंजय मुंडेच्या जाती पर्यंत, जिल्हा, आई-वडिल, मुला-बाळापर्यंत नसावा.
जगाच्या पाठिवर कोणत्याही घटनेची, व्यक्तीची, जिल्ह्याची, जातीची बदनामी २०० दिवस मिडीया ट्रायल द्वारे झाली नसेल. ती मिडीया ट्रायल मी सहन केली आहे. त्या दोनशे दिवसांत दोन वेळा मरता-मरता वाचलो. ती गोष्ट फक्त डाॅ. तात्याराव लहाने यांना माहिती आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते आमदार धनंजय मुंडे यांनी केला.
वंजारी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन आणि विचारमंथन मेळाव्याचे आयोजन रविवारी ठाण्यात करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. संघर्ष काय असतो. तो संघर्ष मी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा पाहिला, आपल्या समाजाचा पाहिला, माझ्या जीवनातील प्रवास आठवल्यानंतरही अंगावर शहारे उठतात.
आज सकल समाजाच्या वतीने समाजातील गुणवंतांचा सत्कार माझ्या हस्ते होत आहे. मला समाजाने किती शिव्या दिल्या हे मला माहिती आहे, त्यावेळी परिस्थितीची ती भावना होती. पण संघर्ष माझा होता. त्या परिस्थितीतून आजचा बदल घडला आहे. त्याला संघर्षाचा विजय म्हणतात असे धनंजय मुंडे म्हणाले.
गोपिनाथ मुंडे यांच्या सोबत संघर्षाच्या काळात सावली सारखा होतो. त्यांचा संघर्ष मी पाहिला आहे. त्या संघर्षांतून ते जिथपर्यंत पोहचले तो देखील पाहिला. साहेबांची इतकी दूरदृष्टी होती की, त्यावेळी मला बाजूला केले नसते तर एकाच मंत्रिमंडळात बहिण आणि भाऊ मंत्री झाले नसते असेही ते म्हणाले.
त्या दोनशे दिवसांत कधी -बालावे आणि कधी बोलू नये हे मी शिकलो. जीवनात ज्यावेळी सर्वांत मोठे संकट आले. त्यावेळी समाज माझ्या मागे उभा राहिला. दोनशे दिवस मी बोलत नव्हतो. सर्व बोलत होते, मी बोलत का नाही. पण मी जे केलेच नव्हते. त्याची प्रतिक्रिया का द्यावी. मी जर प्रतिक्रिया दिली असती तर त्या उत्तरातून हजार प्रश्न अनेकांना विचारायले असते. माझ्यावर कृषी मंत्री असताना आरोप केले. पण न्यायव्यवस्थेने न्याय दिला असेही मुंडे म्हणाले.
आपण वंचितमधील किंचीत आहोत. पण इतक्या मोठ्या पदावर जाताना बऱ्याच जणांना किंचीत राग येईल, म्हणून त्रास होणारच. म्हणून कोणी आमच्या गुणवत्तेवर, आम्ही मिळविलेल्या नोकरीवर बोट दाखवायचे आता सहन करणार नाही असेही त्यांनी मेळाव्यात सांगितले.