ठाणे – शारदीय नवरात्रौत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. यानिमित्त ठाणे शहरातील सर्वच बाजारपेठा वैविध्यपुर्ण वस्तूंनी सजल्या आहेत. बाजारात देवीसाठी लागणारी वस्त्रे, दागिने, पुजेसाठीचे साहित्य या सर्व वस्तू दाखल झाल्या आहेत. अशातच नवरात्रौत्सवात पारंपरिक पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या दांडियांना देखील नागरिकांचे मुख्य आकर्षण ठरत असतात.

यंदा ठाण्यातील बाजारपेठेत धुळे जिल्ह्यातील यंकळवाडी सडगाव येथील आदिवासी समाजातील काही विक्रेते दाखल झाले आहेत. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय असला तरी नवरात्रात ते दांडिया विक्रीतून हंगामी रोजगार मिळवत आहेत.

ठाणे जिल्ह्यात गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रौत्सव पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा केला जातो. ठाणे शहरात शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख नेते आनंद दिघे यांनी टेंभी नाका येथे सुरू केलेल्या जय अंबे माँ सार्वजनिक नवरात्रौत्सव याचे प्रमुख आकर्षण असते. त्याचबरोबर कल्याणच्या दुर्गाडी मंदिरात देखील नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात होतो. शहरातील अनेक ठिकाणी दांडिया गरब्याचे आयोजन केले जाते. यंदा शहरातील बाजारपेठेत धुळे जिल्ह्यातील आदिवासी जमातीतील विक्रेते दाखल झाले आहेत.

हे विक्रेते सुमारे पाच-सहा महिने आधी जंगलातून लाकूड आणतात. त्या लाकडाचे बारकाईने प्रक्रिया करून दांडियाचा आकार दिला जातो. त्यानंतर ते दांडिया उन्हात वाळवले जातात. सुकल्यानंतर त्यांना पॉलिश करून विविध रंगांनी रंगवले जाते. अशा प्रकारे तयार झालेले दांडिया आकर्षक रंगसंगतीमुळे ग्राहकांना आकर्षित करीत आहेत.

ठाण्यातील बाजारपेठेत या दांडिया प्रत्येकी २० रुपयांना विक्री केली जात आहेत. ग्रामीण भागातील या विक्रेत्यांसाठी दांडिया रोजगाराचे साधन ठरत आहे. इतर वेळेस शेती करत असून नवरात्रीच्या काही महिने आधी दांडिया तयार करण्यास सुरूवात करतो. यात वापरण्यात आलेले लाकूड रेशम लाकूड असून जंगलातून ते आणून त्या लाकडाची दांडिया तयार केल्या जातात असे दांडिया विक्रेते गुरूनाथ पवार यांनी सांगितले. तसेच इतर विक्रेते विविध शहरात गेले असल्याचेही त्यांनी सांगितले.

पारंपारिक टोपल्याही दाखल नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ठाण्यातील बाजारपेठ सजल्या आहेत. देवीची मूर्ती, सजावटीच्या वस्तू, कपडे, दागदागिने यांसोबतच दांडियाची खरेदी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. दरवर्षी जळगाव , भुसावळ येथून बांबू उत्पादक शेतकरी शहरात या टोपल्यांची विक्री करण्यासाठी दाखल होतात.

यंदाही ठाणे जिल्ह्यात मुख्यतः ठाणे, डोंबिवली, कल्याण शहरात हे टोपली विक्रेते दिसून येत आहेत. हे शेतकरी गावाहून येताना काही टोपल्या तयार करून आणतात. या टोपल्यांची कमतरता भासल्यास ते मुंबईतील परळ भागातून बांबू विकत घेतात. त्याबांबूपासून टोपल्या तयार करतात. एका बांबूची किंमत १५० रुपये असते. या एका बांबूमध्ये मध्यम आकाराच्या ८ ते १० टोपल्या तयार केल्या जातात.