डोंबिवली – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून डोंबिवली रेल्वे स्थानकात येणारी सकाळी ७.४७ ची डोंबिवली लोकल मुंब्रा, दिवा रेल्वे स्थानकातून प्रवाशांनी भरून येते. नेहमीप्रमाणे अधिकचे प्रवासी या लोकलमध्ये उलट दिशेने बसून येत असल्याने डोंबिवली लोकलमध्ये अलीकडे डोंबिवलीच्या प्रवाशांना आसनच उपलब्ध नाही आणि दाटीवाटीने उभे रहावे लागते, अशी माहिती डोंबिवली लोकलने अनेक वर्ष प्रवास करत असल्याने महिला, पुरूष प्रवाशांनी दिली.
सकाळच्या वेळेत मुंबईला जाणारी धिमी, जलद लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकातून पकडणे अनेक प्रवाशांना अवघड असते. असे प्रवासी डोंबिवली लोकलने मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. डोंबिवली लोकल असल्याने प्रवाशांना बसण्यासाठी आसन उपलब्ध झाले नाही तरी सुटसुटीतपणे उभे राहण्यासाठी जागा मिळते. गर्दीतील प्रवास टाळण्यासाठी डोंबिवली, ठाकुर्लीतील प्रवाशांना डोंबिवली लोकल मोठा आधार आहे.
यापूर्वी डोंबिवली रेल्वे स्थानकात सकाळी ७.४७ च्या वेळेत सीएसएमटीहून येणाऱ्या डोंबिवली लोकलमध्ये मुंब्रा, दिवा भागातून मोजकेच प्रवासी उलट मार्गाने बसून येत होते. लोकलमधील धकाधकीचा प्रवास टाळण्यासाठी प्रवासी अशा उलटमार्गी प्रवासाला पसंती देतात. अलीकडे दिवा, मुंब्रा भागातील बहुतांशी प्रवासी सीएसएमटीकडून येणाऱ्या डोंबिवली लोकलमध्ये दिवा, मुंब्रा रेल्वे स्थानकात बसतात. तेथून १० मिनिटाचा उलट मार्गी डोंबिवलीचा प्रवास करतात. पुन्हा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू करतात, असे डोंबिवलीतील प्रवाशांनी सांगितले.
सामान्य, महिला डब्यांतील बहुतांशी आसने दिवा, मुंब्रा येथून बसून येणाऱ्या प्रवाशांनीच भरून गेलेली असतात. त्यामुळे डोंबिवलीतील प्रवाशाला आसनांच्या मधील जागेत उभे राहावे लागते. महिलांचे डबेही दिवा, मुंब्रा भागातून भरून येतात. सामान्य, प्रथमश्रेणीचा पास असुनही आणि डोंबिवली लोकल डोंबिवलीतील प्रवाशांसाठी असुनही डोंबिवलीच्या प्रवाशांना आता आपल्या लोकलमध्ये बेवारस होण्याची वेळ आल्याने डोंबिवलीतील प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. दिवा, मुंब्रा भागातून बसून येणाऱ्या प्रवाशांनी डोंबिवलीतील अनेक प्रवासी वाद घालतात. पण अगोदर बसून आलेले प्रवासी याविषयी ढिम्म असतात, असे प्रवाशांनी सांगितले.
डोंबिवली लोकलमधील प्रवाशांची होणारी गैरसोय विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने सकाळच्या वेळेत दिवा येथून सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या जलद, धिम्या लोकल सोडाव्यात. दिवा लोकलने मुंब्रा, कळवा भागातील गर्दी मुंबईच्या दिशेने जाईल. त्यामुळे कसारा, कर्जत, आसनगाव, टिटवाळा, बदलापूर भागातून येणाऱ्या लोकलमधील गर्दीचा भार कमी होण्यास मदत होईल, असे प्रवाशांनी सांगितले.
गर्दीमुळे लोकलमध्ये कल्याण, डोंबिवली भागातून लोंबकळत जाणारे प्रवासी. सकाळच्या डोंबिवली लोकलमध्ये मुंब्रा, दिवा भागातून अगोदरच बसून येणारे प्रवासी. त्यामुळे होणारी भांडणे या सर्व गोष्टींचा विचार करून रेल्वे प्रशासनाने सकाळच्या वेळेत दिवा रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने धिम्या, जलद लोकल सोडाव्यात. तसेच, ठाणे ते आसनगाव, कर्जत, कसारा, बदलापूर शटल चालवाव्यात. – लता अरगडे, अध्यक्षा – उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ.