डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगरमध्ये राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाला सहाहून अधिक जणांनी शनिवारी रात्री लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दिवाळीनिमित्त हे बांधकाम व्यावसायिक पत्नीसह दुचाकीवरून डोंबिवलीत बाजारपेठेत खरेदीसाठी चालले होते. त्यांची दुचाकी अडवून त्यांना बेदम मारण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मारहाण करणारे एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे सुनीलनगरमधील रहिवाशांनी सांगितले. राजेश मोरेश्वर शिंदे (५४) असे मारहाण झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. ते कुटुंबीयांसह सुनीलनगरमध्ये राहतात. राजेश शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सचीन कोर्लेकर, ओमनाथ नाटेकर, गावकर यांचा मुलगा, राम चव्हाण आणि इतर यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

राजेश शिंदे यांना मारहाण होत असताना १५ ते २० जण आजुबाजुला उभे होते. पण यावेळी कोणीही त्यांच्या बचावासाठी पुढे आले नाही. राजेश शिंदे यांची पत्नी पतीच्या बचावासाठी प्रयत्न करत होत्या. त्यांनाही मारहाण करणाऱ्यांनी दाद दिली नाही.

राजेश शिंदे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, शनिवारी दुपारी दोन वाजता मी दुचाकीवरून ठाणे येथे कामासाठी निघालो होतो. सुनीलनगर नाका येथे आपले परिचित राणे, गावकर भेटले. यावेळी तेथे इमारतीचा पुनर्विकास करणाऱ्या विकासकाचा सहकारी आला. त्यांना इमारतीत जाण्याची सूचना केली. यापूर्वी आमची इमारत पुनर्विकास करण्याचे काम ओमनाथ नाटेकर घेणारे होते, पण त्यांनी ती घेतली नाही. नाटेकर यांनी इमारतीचा पुनर्विकासाचे काम घेतले असते तर आपण आज त्यांची मिठाई खाल्ली असती. आणि रवीही जिवंत राहिला असता, असे आपण बोललो. हे संभाषण झाल्यावर आपण कामावर निघून गेलो.

शनिवारी रात्री साडे नऊ वाजता मी पत्नीसह दिवाळी निमित्त खरेदीसाठी बाजारात चाललो होतो. तेव्हा गुन्हा दाखल सचीन कोर्लेकर यांनी आपली दुचाकी अडवली. ओमनाथ नाटेकर यांनी आपणास शिवीगाळ करत कुठे मारून टाकीन ते कळणार पण नाही अशी धमकी दिली. त्याचवेळी गावकर आणि त्यांच्या मुलाने आपणास काही कारण नसताना हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. राजेश शिंदे यांची पत्नी पतीच्या बचावासाठी पुढे आल्या. पण त्यांना मारहाण करणाऱ्यांनी दाद दिली नाही. अचानक घडलेल्या या प्रकाराने शिंदे अस्वस्थ झाले.

मी तेथून निघण्याचा प्रयत्न केला. आपणास अडवून ठेवण्यात आले. ओमनाथ नाटेकर यांनी जाहीरपणे लोकांना उद्देशून याची गेमच करा असे बोलून धमकी दिली. यावेळी २० ते २५ जण उपस्थित होते. कोणीही भांडण सोडविण्यास पुढे आले नाही. इतर लोक जमा झाल्यावर आपण मारहाण करणाऱ्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली, असे तक्रारीत म्हटले आहे.