कल्याण – गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत कल्याण डोंबिवली पालिकेच्या विविध निर्माल्य संकलन केंद्रांवर एकूण १६६ टन निर्माल्य जमा झाले. निर्माल्य संकलनासाठी पालिका प्रशासनाने कृत्रिम तलाव, गणेश घाट भागात निर्माल्य कलश तयार केले होते. याठिकाणी विविध सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक, पालिका कर्मचारी गणपती विसर्जनासाठी आलेल्या गणेश भक्तांकडून निर्माल्य संकलनाचे काम करत होते.

जमा झालेले निर्माल्य डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानच्या एमआयडीसीतील खत प्रकल्पात, नाना धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि पालिकेच्या खत निर्मिती केंद्रात खत तयार करण्यासाठी पाठविण्यात आले. गणेशोत्सवापूर्वी पालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि गणेश भक्तांना गणपतीनिमित्त निघणारे निर्माल्य कुठेही फेकून न देता ते पालिकेच्या निर्माल्य कलश, निर्माल्य संकलन केंद्रात जमा करण्याचे आवाहन केले होेते. या आवाहनाला यावेळी गणेश भक्तांनी चांगला प्रतिसाद दिला.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत ६५ ठिकाणी पालिकेने गणपती विसर्जनाची व्यवस्था केली होती.

निर्माल्यात अविघटनशील घटक

पालिकेच्या निर्माल्य संकलन केंंद्रा व्यतिरिक्त गणपती विसर्जन ठिकाणच्या बाजुला पालिका कर्मचारी, स्वयंसेवकांची नजर चुकवून अनेक गणेशभक्त, नागरिकांनी घरातील विविध प्रकारचे निर्माल्य आणून ठेवले. काही नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांमध्ये आणून पिशवीसह निर्माल्य निर्माल्य केंद्रांवर टाकून दिले. त्यामुळे निर्माल्यच्या ढिगांमध्ये काही ठिकाणी प्लास्टिक पिशव्या अधिक प्रमाणात आल्या आहेत. खत केंद्रांंवर हे निर्माल्य नेल्यानंतर तेथे निर्माल्य मधील प्लास्टिक पिशव्या किती आणि कधी वेचून काढायच्या असा प्रश्न खत प्रकल्प केंद्रांना पडला आहे. काहींनी पालिकेकडे निर्माल्यातील प्लास्टिक बाहेर वेचून काढण्यासाठी कामगार देण्याची मागणी केली आहे.

नाना धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि इतर स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी निर्माल्य संकलन केंद्रा ठिकाणीच निर्माल्यातील अविघटनशील घटक बाजुला काढून फक्त खत तयार होईल अशा पध्दतीचे निर्माल्य वेगळे करण्यात महत्वाची भूमिका बजावली. कल्याण डोंबिवली पालिका अधिकाऱ्यांनी यापुढे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील फूल विक्रेत्यांची एक बैठक घ्यावी. त्यांना फुलांच्या हारात प्लास्टिक सदृश्य, चकचकीत कागद, अविघटनशील घटक येणार नाहीत आणि त्याची विक्री होणार नाही अशा पध्दतीने फुलांचे हार विक्री करण्याची सूचना करण्याची मागणी निर्माल्य संकलन केंद्रातील काही पर्यावरणप्रेमी स्वयंसेवकांनी केली.

बाजार समितीच्या फूल विक्री बाजारातून फुले, फुलांचे हार यामधून अविघटनशील घटक विक्रीच्या माध्यमातून बाहेर आले नाहीत तर या घटकांचा प्रश्न उरणार नाही. यावेळी फुलांच्या हारांमध्ये अधिक प्रमाणात अविघटनशील घटक आले आहेत, अशी माहिती काही खत प्रकल्पांच्या चालकांनी दिली. पुढील वर्षी पालिकेने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील फूल विक्रेत्यांची पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी आणि त्यांना जलप्रदूषण, अविघटनशील असे घटक फुलांच्या हारात येणार नाहीत आणि त्याची विक्री होणार नाही यादृष्टीने सूचना करण्याची मागणी काही स्वयंसेवकांनी केली आहे.