ठाणे : ठाणे जिल्ह्यात भाजपचे नेते वन मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामधील राजकीय चढाओढ सर्वश्रुत आहे. अनेकदा गणेश नाईक यांनी रोखठोकपणे त्यांची मते मांडत शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका केली. ठाणे शहर हे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. असे असतानाही ठाण्यात येऊन गणेश नाईक यांनी ‘ठाण्यात भाजपाचे कमळ फुलवायचंय!’ असे विधान केले होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीपदावरही त्यांनी एक वक्तव्य केल्याने राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांना लाॅटरी लागल्याचा उल्लेख नाईकांनी केला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही या वक्तव्यावरून शिंदे यांचा समाचार घेतला. गणेश नाईकांनी लाॅटरी हा शब्द वापरला. परंतु त्यांच्या मनात मटका हा शब्द असावा. मटक्याचा आकडा काढणारा दिल्लीत बसला आहे, दिल्लीत जाऊन आकडा लावण्याचा प्रयत्न ते करत आहेत. पण, आकडा लागत नाही अशी टीका राऊत यांनी शिंदे यांच्यावर केली.

वन मंत्री गणेश नाईक हे त्यांच्या रोखठोक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सकारात्मक कार्य करीत असून, भाजपाने ठाणे शहराची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे. नवी मुंबई सारखाच कारभार ठाण्यात करायचा असून, ठाणे सुरळीत करण्याचे काम माझ्यावर आहे. आपल्या सर्वांना `ओन्ली कमळ’ फुलवायच आहे असे विधान केले होते. दरम्यान, या वक्तव्यानंतर शिंदे गटाकडून गणेश नाईक यांच्याविरोधात समाजमाध्यमावर टीका केली जात होती. गणेश नाईक यांची अनेक विधाने हे प्रत्यक्षपणे शिंदे गटाविरोधात असतात.

शिंदेंना मंत्रिपदाची लाॅटरी…

वनमंत्री गणेश नाईक हे १५ ऑगस्टला पालघर येथील एका शासकीय कार्यक्रमात गेले होते. त्यावेळी त्यांनी वक्तव्य केले. त्यामध्ये ते म्हणत आहेत, प्रत्येकाचे नशीब असते, लाॅटरी लागते की नाही. पण एकनाथ शिंदेंना लाॅटरी लागली. आनंद आहे त्या गोष्टीचा… पण कमविलेले टिकविता आले पाहिजे असे माझे मत आहे. कसे कमविले, किती कमविले आणि कसे टिकविले यावर जनसामान्यांची नजर असते असे नाईक म्हणाले. या वक्तव्याने खळबळ उडाली.

राऊतांचा टोला

गणेश नाईक यांच्या वक्तव्यावर राऊत यांनी देखील शिंदेंना टोला लगाविला. गणेश नाईक यांच्यावर आम्ही अनेकदा टीका केली. पण नाईक यांनी कधीही संयम सोडून आमच्यावर प्रति टीका केली नाही. काल ते म्हणाले कोणाला तरी लाॅटरी लागली आणि ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झाले. परंतु लाॅटरी हा प्रतिष्ठित शब्द आहे. महाराष्ट्रात आजही बेकायदेशीरपणे मटका सुरु आहे. फडणवीस जरी मुख्यमंत्री असले तरी आकडा लावला जातो. गणेश नाईक हे सभ्य, संस्कारी असल्यामुळे त्यांनी लाॅटरी हा शब्द वापरला. पण, त्यांच्या डोक्यात मटका असेल. मटक्याचे आकडे हे चंचल असतात. मटक्याचा आकडा काढणारा दिल्लीत बसला आहे, ते दिल्लीत जाऊन आकडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, आकडा लागत नाही अशी टीका राऊत यांनी शिंदे यांच्यावर केली.