Ghodbandar Traffic ठाणे : मुंबई महानगरातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावरील खड्डे, सुरू असलेली प्रकल्पाची कामे यामुळे वाहतूक कोंडीबरोबरच अपघात होत आहेत. याप्रकारामुळे मेटाकुटीला आलेल्या नागरिकांकडून खड्डे आणि कोंडीमुक्त रस्ते देण्याची मागणी होत असून यासाठी नागरिक गेल्या काही दिवसांपासून आंदोलने करत आहेत. शनिवारी नागरिकांनी पुन्हा कासारवडवली पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करत पोलिसांना मागण्यांचे पत्र दिले. त्याचबरोबर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे पदाधिकाऱ्यांनीही याच प्रश्नी पोलिसांची भेट घेऊन त्यांना निवदेन दिले.
घोडबंदर परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे, सुरू असलेले प्रकल्प तसेच रस्त्यांची आणि सार्वजनिक सुविधांची अत्यंत निकृष्ट अवस्था यांमुळे दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. वाहनचालक, पादचारी आणि प्रवासी यांचे जीव धोक्यात येत असून सार्वजनिक सुरक्षेवर गंभीर परिणाम होत आहे. असे वारंवार होणारे अपघात हे केवळ दुर्दैवी प्रसंग नसून, रस्ते बांधकाम, दुरुस्ती आणि देखभालीतील निष्काळजीपणाचे थेट परिणाम आहेत. प्रचलित कायद्यांनुसार, संबंधित ठेकेदार, अभियंते किंवा अधिकारी हे सार्वजनिक बांधकामांची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यास बांधील आहेत.
अशा प्रकरणांमध्ये त्रुटी किंवा निष्काळजीपणा आढळल्यास, भारतीय न्याय संहिता मधील निष्काळजीपणामुळे मृत्यू, तसेच लोकांच्या जीवितास धोका निर्माण करण्यासंबंधी तरतुदीनुसार संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी पत्राद्वारे केली आहे.
नागरिकांच्या मागण्या
कासारवडवली हद्दीतील नुकत्याच घडलेल्या अपघातांची सखोल चौकशी करण्यात यावी. रस्ते बांधकाम आणि दुरुस्तीबाबत जबाबदार ठेकेदार आणि अभियंत्यांचे उत्तरदायित्व निश्चित करण्यात यावे. निष्काळजीपणा आढळल्यास भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. गर्दीच्या वेळेत प्रमुख चौकांवर वाहतूक पोलीस तैनात करून वाहतुकीचे नियंत्रण राखावे. सुरू असलेल्या सर्व रस्ते कामांवर योग्य बेरिकेडिंग, दिशादर्शक फलक व सुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे लागू कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी पत्रात केली आहे.
ठाकरे गट, मनसेचेही पोलिसांना पत्र
घोडबंदर मार्गावरील रस्त्यावरील खड्डे, मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी कामे, वाहतूक कोंडी यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तसेच या ठिकाणी होणाऱ्या अपघातांना आळा बसावा, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. या प्रश्नी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे माजी नगरसेवक नरेश मनेरा आणि मनसेचे पदाधिकाऱ्यांनी कासारवडवली पोलिसांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.