ठाणे – मुंबईसह ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने मंगळवारीही अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ठाण्यात सोमवारी दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत होता. मंगळवारीही पहाटे पासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

या पावसामुळे ठाणे शहरातील दिवा डायघर, कोपरी, येऊर या भागात पाणी साचल्याच्या तक्रारी ठाणे महापालिका आपत्ती विभागाकडे दाखल झाल्या आहेत. नौपाडा बी – केबिन जवळ सोमवारी रात्री उशिरा एक झाड पडल्यामुळे रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांचे नुकसान झाले. तर, मंगळवारी मध्यरात्री ३.३० वाजताच्या सुमारास या परिसरातच एका चार मजली इमारतीतील पहिल्या मजल्यावरील सदनिकेचे प्लास्टर पडल्याची घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने या दोन्ही घटनेत कोणतिही जिवीत हानी झालेली नाही.

ठाणे शहर तसेच उपनगरात सोमवारी मध्यरात्री पावसाचा जोर कायम होता. मंगळवारी पहाटेपासून पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे मंगळवारी देखील नोकरदार वर्गाचे कामाच्या ठिकाणी पोहोचताना हाल झाले आहेत. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत मुंबई,ठाणे आणि उपनगरांत काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या २४ तासात २२३. ७३ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. तर, मुंबईसह ठाणे शहराला मंगळवारीही रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेला गोंधळ टाळण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने सर्व शाळांना आज, मंगळवारी सुट्टी जाहीर केल्यामुळे विद्यार्थी घरी आहेत, त्यामुळे पालकांची चिंता मिटली आहे.

डोंबिवलीतही स्थानक परिसर जलमय

ठाण्यासह डोंबिवली कल्याण शहरातही पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे डोंबिवली पूर्व स्थानक परिसरात मोठ्याप्रमाणा पाणी भरले असून नागरिकांना तेथून वाट काढणे कठीण झाले आहे.

उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरात पावसाची संततधार

उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरात पावसाची संततधार पाऊस सुरू आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. परंतू, धोका नाही. तर, पावसामुळे रेल्वे गाड्या १०-१५ मिनिटे उशिराने धावत आहेत.

ठाण्यात पावसामुळे अनेक रस्ते जलयम

ठाणे घोडबंदर वाहिनीवर चितळसर पोलीस स्टेशन समोर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे एकाच मार्गिकेवर वाहतूक सुरु आहे. तर, मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालायाच्या हद्दीमध्ये करपे कंपाउंड या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तसेच याठिकाणी खड्डे देखील पडले आहेत. त्यामुळे वाहने खड्ड्यामध्ये अडकत आहेत.

याठिकाणी एकाच मार्गिकेवरुन वाहतूक सुरु आहे. त्यामुळे तेथून वाहनाचा बॅकलॉग हा ठाणे शहरातील आनंदनगर पर्यंत आलेला आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वाहतूक नियमन करीत आहेत. त्यामुळे नागरिकांना पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे की, घोडबंदर मार्गाचा वापर गरज नसल्यास करू नये. तसेच चुकीच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न करू नये आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.