कल्याण : कल्याण शहर आणि परिसरातील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते यांनी मंगळवारी मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकाराने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने विविध पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश देण्याची मोहीम सुरू केली आहे. गेल्या दोन महिन्याच्या काळात डोंबिवली, कल्याणमधील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे येत्या काळात आपल्या भागात, प्रभागात विकास कामे करून घ्यायची असतील सत्तेशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत आहोत, असे भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सांगितले. मागील काही महिन्यांपासून ठाकरे गटातील कल्याण, अंबरनाथ परिसरातील कार्यकर्ते आमदार किसन कथोरे यांच्या संपर्कात आले होते. या कार्यकर्त्यांची भाजप पक्षात प्रवेश करण्याची मते जाणून घेतल्यानंतर आमदार कथोरे यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना हा विषय सांगितला.
त्यानंतर तातडीने भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असलेल्या ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे उपजिल्हाप्रमुख सदाशिव सासे, जिल्हा परिषद सदस्या जयश्री सासे, अंबरनाथच्या जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा राऊत, किरण राऊत याशिवाय ठाकरे गटाचे उप तालुकाप्रमुख कैलास धुमाळ, तालुका समन्वयक प्रदीप वारे, ज्येष्ठ कार्यकर्ते अनंता जाधव, रायता सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षा निर्मला सासे, कुंदा सेवा सहकारी संस्थेचे शिवाजी भोईर, सामाजिक कार्यकर्ते शरद सासे, आणे भिसोळ ग्रामपंचायतीच्या सदस्या जिजाबाई वाघमारे यांच्यासह त्यांच्या समर्थक शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि जीवनदीप महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांनीही प्रयत्न केले. भाजप कार्यालयातील या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला आमदार किसन कथोरे, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे, ठाणे जिल्हा मध्यवर्ति सहकारी बँकेचे संचालक राजेश पाटील, शेखर लोणे, दिनेश कथोरे, योगेश धुमाळ, पद्माकर हरड, नेताजी भोईर, सुयोग मगर उपस्थित होते.
कल्याण, अंबरनाथ परिसरातील आपल्या जुन्या समर्थक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश करण्याची इच्छा दाखविली होती. भाजपची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी अशा कार्यकर्त्यांची गरज आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश देण्यात आला. आपल्या परिसरातील नागरी विकासाचे प्रश्न मार्गी लागावेत एवढीच या कार्यकर्त्यांची मागणी आहे. – किसन कथोरे, भाजप आमदार, मुरबाड.