कल्याण : गेल्या वीस दिवसांच्या कालावधीत पोलीस उपायुक्तांचे विशेष अंमली पदार्थ विरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांनी कल्याण, डोंबिवलीतील सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १३ जणांना विविध भागातून अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख ५५ हजार रूपयांचा गांजा, एमडी पावडर (मेफोड्रिन), गुंगी आणणाऱ्या प्रतिबंधित कोडिनयुक्त बाटल्या जप्त केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणात कल्याणमधील बाजारपेठ, खडकपाडा, कोळसेवाडी, डोंबिवलीत मानपाडा, टिळकनगर, विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याण, डोंबिवली शहरे नशामुक्त करण्याचे अभियान सुरू केले आहे. शहरातील अंमली पदार्थ तस्करी, मद्य, गांजा सेवन हे प्रकार थांबले तर शहरातील गैरकृत्य थांबणार आहेत. त्यामुळे मुळावर घाव घालून शहरातील अंमली पदार्थांचे अड्डे, त्यामधील सहभागी यांच्यावर विरुध्द उपायु्क्त झेंडे यांच्या नियंत्रणाखालील अंमली पदार्थ विरोध पथकाने जोरदार कारवाई सुरू केली आहे. स्थानिक पोलीस या मोहिमेत सहभागी होत आहेत.

मागील अनेक वर्षात कल्याण, डोंबिवलीत अशाप्रकारच्या कारवाया कधी झाल्या नाहीत. त्यामुळे शहरात अंमली पदार्थ विक्रीचे अड्डे तेजीने वाढले. या व्यवहारात झटपट पैसा मिळत असल्याने तरूण वर्ग या व्यवहारात अडकला. शहरातील एक मोठी तरूण फळी नशेच्या आहारी गेल्याचे चित्र असल्याने पोलिसांनी शहरात नशामुक्त अभियान सुरू केले आहे. ठाणे ते कर्जत दरम्यान अंमली पदार्थ विक्रीचा लपुनछपून करण्याचे मूळ डोंबिवली पश्चिमेत असल्याची चर्चा आहे.

बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतून ४५ हजार रुपये किमतीच्या ४० गुंगीकारक प्रतिबंधित कोडिनयुक्त बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणात दोन जण अटकेत आहेत. खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीत ३१ हजार रुपये किमतीची १० ग्रॅम एमडी पावडर, दोन हजार १८० ग्रॅम वजाचा गांजा जप्त करण्यात आला. बाजारातील त्याची किंमत ३२ हजार रूपये आहे. याप्रकरणात चार जण अटकेत आहेत.

कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीत सात हजार रूपये किमतीचा १४४ ग्रॅम गांजा एका इसमाकडून जप्त करण्यात आला आहे. मानपाडा, टिळकनगर, विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत ८० हजार रूपये किंमतीचा ३२०७ ग्रॅम वजनाचा गांजा , मानपाडा हद्दीत नऊ हजार रूपये किंमतीचा ३९१ ग्रॅम वजनाचा गांजा, एक लाखाहून अधिक किमतीची ३४ ग्रॅम एमडी पावडर , टिळकनगर पोलीस ठाणे हद्दीत ४४ हजार रूपये किमतीच्या १९२ प्रतिबंधिक कोडिनयुक्त बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणात एकूण सहा जण अटकेत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan dombivli police arrested 13 people in drug smuggling case asj