कल्याण – कल्याणमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्याने कल्याणमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार खिंडार पडले आहे. कल्याणमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अस्तित्व जेमतेम होते. यामध्ये माजी नगरसेवक बोरगावकर हे पक्षाचे स्थानिक खंदे नेतृत्व होते.
ठाणे येथे दिवंगत आनंद दिघे आनंदाश्रमध्ये माजी नगरसेवक बोरगावकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, आमदार विश्वनाथ भोईर, शहरप्रमुख रवी पाटील यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांनी समर्थकांसह शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हे पक्षप्रवेश महत्वाचे मानले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मोजक्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बळावर कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व होते. यामध्ये माजी नगरसेवक उमेश बोरगावकर हे राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिका आणि शहरातील बुलंद तोफ म्हणून ओळखली जात होती.
शहरातील नागरी समस्या, विकासाचे प्रश्न विषयावर यापूर्वी त्यांनी पालिका सभागृहात नेहमीच आवाज उठविला. पालिका सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते पद त्यांनी भुषविले. कल्याण शहरातील नागरी समस्या विषयावरील आंदोलनात बोरगावकर आणि कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता. आगामी महापालिका निवडणुका चार प्रभाग मिळून होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची शहरातील ताकद पाहता यात आपला टिकाव लागणार नाही. असा विचार करूनही काही कार्यकर्त्यांनी आपली पुढच्या राजकीय कारकिर्दीची सोय शिंदे शिवसेनेत येऊन केली असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळत नसल्याची चर्चा होती. सत्ता नसल्याने कार्यकर्ते सैरभैर होते. त्यामुळे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह प्रभाग अध्यक्ष गोरख साबळे, महिला प्रभाग अध्यक्ष उषा गोरे अशा शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या प्रभागात अनेक नागरी समस्या आहेत. पालिकेत पाठपुरावा करूनही ही कामे मार्गी लागत नव्हती. ही कामे मार्गी लागावीत म्हणून नागरिकांचा रेटा वाढला होता. अशा परिस्थितीत ही कामे झाले नाही तर त्याचा मोठा फटका आगामी पालिका निवडणुकीत आपल्याला बसेल, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती.
या सर्व कार्यकर्त्यांनी माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांची भेट घेतली. आपल्या नागरी समस्यांविषयक व्यथा मांडल्या. त्यानंतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या मताचा विचार करून बोरगावकर समर्थकांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. प्रभागांमध्ये रस्ते, पायवाटा, गटार, खड्डे असे अनेक प्रश्न आहेत. ही सर्व कामे मार्गी लागली पाहिजेत. यासाठी सत्तेशिवाय पर्याय नाही. म्हणून आम्ही कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे, असे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांनी सांगितले.