डोंबिवली : आतापर्यंत महाराष्ट्रात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचे महायुतीचे ट्रिपल इंजिनचे सरकार काम करत होते. आता या इंजिनना मनसेचे मूळ इंजिन जोडले गेल्याने या ट्रिपल इंजिन महायुती सरकारला आणखी गती मिळेल आणि वेगवान विकास पाहण्यास मिळेल, असा विश्वास कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी रविवारी डोंबिवलीत खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या येथील सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरातील कार्य अहवाल प्रकाशन समारंभात व्यक्त केला. ट्रिपल इंजिनचे सरकार असले तरी या इंजिनमध्ये खरे इंजिन हे मनसेचे मूळ इंजिन आहे, याची जाणीव ठेवावी असे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. शिंदे यांच्याकडे पाहत मिश्किल टिपणी केली.

सोडून गेलेले उमेदवार

महायुतीमध्ये मनसे सामील झाली असली तरी मनसेचे कार्यकर्ते महायुती उमेदवारांचा प्रचार करतील का, अशा वावड्या उठल्या आहेत, याविषयी बोलताना आमदार पाटील यांनी कल्याण आणि भिवंडी लोकसभेतील दोन्ही उमेदवारी यापूर्वी मनसेमध्ये होते. ते दोन्हीही मनसे सोडून गेलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याशी आता आमचा काही संबंध राहिलेला नाही. अशा सोडून गेलेल्यांकडे मनसे ढुंकुण पाहत नाही, असे सांगून आमदार पाटील यांनी मनसे भक्कमपणे कल्याण लोकसभेत डाॅ. श्रीकांंत शिंंदे आणि भिवंडीत कपील पाटील यांच्या पाठीशी असल्याचे संंकेत दिले.

हेही वाचा : लोकसभा निवडणुकीमुळे कल्याण-डोंबिवलीत चोरट्या मद्याची उलाढाल वाढली, ३०० लिटर गावठी आणि विदेशी मद्य जप्त

लुटूपूटुचे वाद

विकास कामे, निधी विषयांंवरून यापूर्वी आमचे आणि खा. डाॅ. शिंदे यांंच्यात काही लुटुपुटुच्या लढ्या झाल्या असल्या तरी ते वाद तात्विक होते. आम्ही एकमेकांची मने कायमची तोडली नाहीत, अशा शब्दात आमदार पाटील यांंनी आपण डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत भक्कमपणे असल्याची ग्वाही दिली.

महायुतीला पाठिंबा देण्याबाबत आपणास यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपर्क केला होता. आपण ही जबाबदारी आपले नेते राज ठाकरे याच्याशी बोलून निर्णय घ्या, असे कळविले. महायुतीकडून राज ठाकरे यांना विचारणा होताच मोदी यांच्यासाठी मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. हीच कृती यापूर्वी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी बोलून केली असती तर आता राज्यात वेगळे चित्र दिसले असते, असे सांगून पाटील यांंनी उध्दव ठाकरे यांना लक्ष्य केले.

हेही वाचा : ठाणे लोकसभेच्या जागेत संभ्रम कायम, उमेदवार अनिश्चितीमुळे महायुतीचा प्रचार थंडावला

मागण्या

ठाण्यातील बाळकुम, गायमुख भागातून येणारा उड्डाण पूल कोपर, रेतीबंदर भागापर्यंत आणून उतरविला तर वाहतुकीचे विभाजन होऊन नागरिकांना पाच मिनिटात मुंब्रा शहरापर्यंत जाणे शक्य होईल. तसेच या भागात सर्वाचेपचारी रुग्णालये आणि क्रीडासंंकुले विकसित करण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली.

श्रीकांंत शिंदे यांच्या कार्य अहवाल प्रकाशन कार्यक्रमात आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड व्यासपीठावर उपस्थित होत्या. शिवसेनेकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. विकासाच्या विषयावर बोलताना आमदार राजू पाटील यांचा उल्लेख करताना खासदार शिंदे यांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटत होती.