Mumbai Ahmedabad Bullet Train / ठाणे : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या निर्माणाचे काम सध्या सरकारकडून सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प असल्याने या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. दुसरीकडे विरोधी पक्षातील नेते हा प्रकल्प फक्त मुंबई अहमदाबाद पर्यंत का केला जात आहे असे म्हणत टीका करत आहेत.
असे असले तरी या प्रकल्पाच्या ठाणे रेल्वे स्थानकाचे एक प्रतिकात्मक चित्रीकरण प्रसारित होत आहे. हे चित्रीकरण पाहिल्यास बुलेट ट्रेनचे ठाणे स्थानक एखाद्या विकसित परदेशातील बुलेट ट्रेन स्थानका प्रमाणे दिसत आहे. प्रतिकात्मक चित्रीकरण तयार केले असले तरी ते प्रत्यक्षात उतरेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉर, ५०८ किमी पर्यंत असेल. महाराष्ट्र आणि गुजरात राज्या दरम्यान हा प्रकल्प असणार आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बी.के.सी) परिसरातून सुरू होणारी, ३२० किमी/ताशी वेगाने धावणार असल्याचा दावा सरकार करत आहे.
बोईसर, भरूच आणि अंकलेश्वर या औद्योगिक शहरांना आणि येणाऱ्या वाढवाण बंदराला (बोईसर स्थानकाद्वारे) हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भरूच, बडोदा, आणंद, अहमदाबाद अशा दहा शहरांमध्ये ही ट्रेन थांबेल आणि साबरमती येथे शेवटचा थांबा असेल. हा संपूर्ण प्रवास मर्यादित थांब्यांसह (सुरत, बडोदा आणि अहमदाबाद येथे) सुमारे २ तास ७ मिनिटांत पूर्ण केला जाईल असा दावा नॅशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून केला जात आहे.
प्रकल्पाचे वैशिष्ट्य कसे असेल
या बुलेट ट्रेन मार्गावर एकूण १२ स्थानके असून आपल्या महाराष्ट्र राज्यातील चार स्थानकांचा सामावेश आहे. स्थानकांमध्ये मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरुच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती स्थानकांचा सामावेश असेल. एकूण ५०८ किमीच्या या प्रकल्पातील ३४८ किमी गुजरात, ४ किमी दादरा नगर हवेली आणि १५६ किमी महाराष्ट्रातील आहे.
ठाणे खाडीखालील देशातील पहिल्या सात किमी लांबीच्या खाडी खालील बोगद्यासह २१ किमी लांबीचा भूमिगत बोगदा ह्या अलाइनमेंटमध्ये आहे. न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (एन.ए.टी.एम.) या दोन टनेलिंग पद्धतींचा वापर करून संपूर्ण २१ किमीचा बोगदा तयार करण्यात येणार असून उर्वरित १६ किमी चा बोगदा टनेल बोरिंग मशिन्स (टी.बी.एम.) द्वारे तयार करण्यात येणार आहे.
ठाणे स्थानक कसे असेल
स्थानकात प्रवेश करण्यासाठी भव्य अशी इमारत असेल. येथूनच काही मिनीट अंतरावर मेट्रो देखील धावणार असेल. बुलेट ट्रेन स्थानकात प्रवेश करण्यासाठी बसगाड्यांसाठी विशिष्ट मार्गिका असेल. टॅक्सी आणि रिक्षा थांबाही येथे उपलब्ध असेल. माथार्डी जेट्टीला जाण्यासाठी वेगळी मार्गिका उपलब्ध असेल. स्थानकाजवळ हरित मार्गिका आणि पब्लिक प्लाझा उपलब्ध केला जाईल.