Thane News : ठाणे : मराठा मोर्चाच्या आंदोलकांसाठी रोखून धरलेली अवजड वाहनांची वाहतुक ऐन सकाळी सोडण्यात आल्याने ठाणे जिल्ह्यातील मुंबई नाशिक महामार्ग आणि मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील वाहतुक पूर्णत: ठप्प झाली होती. वाहन चालकांना अवघ्या १० मिनीटांचे अंतर गाठण्यासाठी पाऊण ते एक तास लागत होता. आमदार डाॅ. बालाजी किणीकर यांना देखील या कोंडीचा फटका बसला. ठाण्यात पक्ष कार्यक्रमासाठी निघालेल्या बालाजी किणीकर कार यांना कारऐवजी रिक्षाने ठाणे गाठावे लागले.
मुंबई नाशिक महामार्गाने हजारो आंदोलक मुंबईतील आझाद मैदानाच्या दिशेने निघाले होते. त्यामुळे अपघात ठाणे वाहतुक पोलिसांनी अवजड वाहनांना रोखून ठेवले होते. त्याचा परिणाम संपूर्ण वाहतुक व्यवस्थेवर झाला. आंदोलक मुंबईच्या दिशेने गेल्याने पोलिसांनी रोखून धरलेली अवजड वाहने सोडली. त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर झाला. मुंबई नाशिक महामार्गावर साकेत पूल ते ओवळी खिंड पर्यंत वाहतुक कोंडी झाली होती. त्याचा परिणाम मुंब्रा बाह्यवळण मार्गावर देखील झाला. खारेगाव टोलनाका ते कौसा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहन चालकांना अवघ्या पाच ते १० मिनीटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना पाऊण ते एक तास लागत होता. त्यामुळे कामानिमित्ताने बाहेर पडणाऱ्या नागरिकांना कोंडीत अडकावे लागले.
किणीकरांची कोंडी
शिवसेना शिंदे गटाचे अंबरनाथ विधानसभेचे आमदार बालाजी किणीकर हे एका माजी नगराध्यक्षासह ठाण्यात पक्ष कार्यक्रमासाठी येत होते. परंतु मुंब्रा बाह्यवळण मार्गावर वाहतुक कोंडीत ते अडकून होते. अखेर ते मोटारीतून खाली उतरले. त्यानंतर त्यांनी दुचाकीने मुंब्रा गाठले. तेथून ते रिक्षाने ठाण्यासाठी निघाले. त्यामुळे आमदारांनाही या कोंडीमुळे मन:स्ताप सहन करावा लागला.