ठाणे : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ पाच महिन्यांपूर्वी झालेल्या दुर्घटनेला मध्य रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचा ठपका तपास अहवालात ठेवण्यात आल्यानंतर प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीमुळे प्रवाशांचे बळी गेले असून त्यांच्या कुटुंबीयांना नोकरी द्यावी, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली. या प्रकरणात आणखी दोषी असल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुंब्रा स्थानकाजवळ तीव्र वळणावर ९ जून रोजी दुर्घटना झाली होती. वळण मार्गावर कसारा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाच्या दिशेने वाहतूक करणारी आणि सीएसएमटी येथून कर्जतच्या दिशेने वाहतूक करणारी रेल्वेगाडी एकाचवेळी आल्यानंतर हा अपघात झाला. या घटनेत आठ प्रवासी रेल्वे रुळांवर पडले, तर सहा प्रवासी रेल्वेगाडीच्या डब्यात पडून जखमी झाले. रेल्वे रुळांवर पडलेल्या प्रवाशांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. या प्रकरणाची अंतर्गत चौकशी केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने अहवाल तयार केला. हा अपघात अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे झाल्याचा ठपका त्यात ठेवण्यात आला. रेल्वे रुळांची दुरुस्ती योग्य पद्धतीने केली नसल्याने ही दुर्घटना झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि साहायक्क विभागाीय अभियंता विशाल डोळस यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अपघातानंतर प्रवासी संघटनांनी रेल्वेच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त करत प्रवाशांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. रेल्वेने सुरुवातीला या प्रकरणात प्रवाशांची चूक असल्याचे सांगत प्रकरणातून काढता पाय घेतला होता. परंतु अहवालामध्ये आता रेल्वे प्रशासनाची चूक सिद्ध झाल्याचा आरोप संघटनांनी केला. यााबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डाॅ. स्वप्निल निला यांना संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.
अहवालात काय?
- मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडल्याने मुंब्रा रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी भरले होते. रेल्वे रुळांखालील खडी निघाली होती. तसेच जमीन आणि फलाट क्रमांक चारदेखील खचला होता. याची माहिती अभियंत्यांना मिळाल्यानंतरही त्यांनी तेथील देखभाल दुरुस्ती केली नव्हती.
- ६ जूनला मुंब्रा रेल्वे स्थानकाबाहेरील नाला तुंबला होता. त्याचे पाणी फलाट क्रमांक तीन आणि चारमधील रेल्वे रुळांवर साचले होते. त्यामुळे वेगमर्यादा निश्चित केली होती होती. तो वेग कमी करणे आवश्यक होते.
- दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान वळणाजवळ रेल्वेगाड्या घासल्याने हिसके लागत होते. ५ जूनला मध्यरात्री रेल्वे रुळ बदलण्यात आले. ज्या ठिकाणी रेल्वे रुळ बदलले तेथे जोडणी (वेल्डिंग) करून रूळ व्यवस्थित करणे आवश्यक होते. परंतु जोडणी करण्यात आली नाही. त्यामुळे मुंब्रा स्थानकात फलाट क्रमांक चारच्या दिशेने जाणारी रेल्वेगाडी फलाट क्रमांक तीनच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाडीच्या दिशेने झुकली.
- दोन्ही मार्गिकेवरील रुळांमधील अंतर निश्चित प्रमाणापेक्षा कमी आढळून आले.
सुरुवातीला हा अपघात प्रवाशांमुळे झाल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. परंतु आता रेल्वे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीमुळे हा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघात प्रकरणात आणखी अधिकारी दोषी आहेत का याचा तपासही होणे आवश्यक आहे. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका व्यक्तीला रेल्वेमध्ये नोकरी देण्यात यावी. जेणेकरून त्यांच्या कुटुंबीयांना आधार मिळेल. – लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ.
या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी आम्ही वारंवार मागणी केली होती. रेल्वे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीमुळे प्रवाशांचा जीव गेल्याचे सिद्ध झाले आहे. १५ वर्षांपूर्वी ट्रॅकमन आणि गँगमन हे रेल्वे रुळांवर नेहमी पाहणी करत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने उपाययोजना करून भविष्यात असे अपघात घडू नयेत यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. – राजेश घनघाव, अध्यक्ष, कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटना.
मुंब्रा अपघात प्रकरणानंतर अहवालातून दिसते की, रेल्वेकडून वेळोवेळी रूळ किंवा इतर बाबींची दुरुस्ती केली जात नाही. तसेच ठेकेदारांवरही रेल्वेचा वचक राहिलेला नाही. – शैलेश राऊत, सल्लागार, कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटना.
रेल्वे रुळ दुरुस्तीची कामे कंत्राटदारांकडून केली जातात. रेल्वे प्रशासनाने कंत्राटदाराच्या कामावर लक्ष दिले असते तर या प्रवाशांचा बळी गेला नसता. – विजय भोईर, अध्यक्ष, संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटना.
