ठाणे : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ लोकलमधून पडल्याने चार प्रवाशांना जीव गमवावा लागल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आज, मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ठाणे रेल्वे स्थानकात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. हा मोर्चा ठाणे रेल्वे स्थानकाजवळील गावदेवी मैदान ते ठाणे स्थानक असा निघणार आहे. मोर्चात प्रवाशांचाही सहभाग असणार आहे.
मध्य रेल्वेच्या मार्गावर सकाळच्या वेळेस कसारा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाच्या दिशेने एक लोकलगाडी जात होती. या रेल्वेगाडीमध्येही प्रवाशांची मोठी गर्दी होती. प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा शिल्लक नव्हती. त्यामुळे प्रवासी अक्षरश: डब्याच्या दरवाजामध्ये लटकून प्रवास करत होते. ही लोकल मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आली. त्यावेळी बाजूच्या रुळावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत ही लोकल जात होती. या दोन्ही लोकल गाड्यामध्ये दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एकमेकांना तसेच त्यांच्याकडील बॅगांचा धक्का लागून दोन्ही गाडीतील एकूण १३ प्रवासी खाली पडले. या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रवाशांच्या समस्येचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
दुसरीकडे मनसेने ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानक परिसरात मनसेने फलकबाजी केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी स्थानक परिसरात फौजफाटा तैनात केला आहे. या मोर्चात प्रवाशांचाही सहभाग असणार आहे असे मनसेने स्पष्ट केले. ठाणे स्थानकाजवळील गावदेवी मैदान येथून हा मोर्चा सकाळी ९ नंतर निघणार आहे.