अंबरनाथ : एकीकडे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी मतचोरीच्या आरोपांची राळ उडवत असताना दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुद्धा आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना याच बाबतीत मोलाचा सल्ला दिला आहे. निवडणुकीआधीच मतदार याद्यांवर काम सुरू करा, बोगस मतदारांची नावे शोधा, बीएलओशीं संवाद ठेवा असा सल्ला अंबरनाथ येथील पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी दिला आहे. शुक्रवारी राज ठाकरे अंबरनाथ शहरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते.
देशात कॉंग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतचोरीच्या मुद्दयाला महत्व देऊन त्याविरूद्ध मोहिम उघडली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी गुरूवारी याबाबत सविस्तर पत्रकार परिषद घेत अनेक आरोप केले. या आरोपांनंतर देशभरातील विरोधी आघाडीतील घटक पक्षांनीही गांधी यांच्या वक्तव्याला पुढे नेत आरोप केले.
महाराष्ट्रातूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी टीका केली. तर त्यापाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही याच मुद्द्यावर जोर देत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला आहे.
राज ठाकरे शुक्रवारी सकाळी अंबरनाथ शहरात दाखल झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थी सेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी पूर्वेतील पनवेलकर सभागृहात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांचे मोबाईल बाहेर जमा करण्यात आले होते. त्यामुळे राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी काय संवाद साधतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मनसेतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मतदार याद्यांवर काम करण्याचा मोलाचा सल्ला दिला. आतापासूनच मतदार याद्यांवर काम सुरू करा. कोणते मतदार बोगस आहेत. वगळलेली आणि समाविष्ट केलेली नावे यांची माहिती ठेवा. याद्या तपासा, बीएलओंशी संवाद ठेवा, असा सल्ला यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. जे सोडून गेले ते आपले नव्हते, असेही राज ठाकरे यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले. त्यामुळे नव्या उत्साहाने कामाला लागा, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
पक्षफुटीनंतर कार्यकारणी
अंबरनाथ शहरातील मनसेचे माजी नगरसेवक विद्यमान शहर अध्यक्षांसह शिवसेना शिंदे गटात गेले. राज ठाकरे यांचे निकटवर्तीय, माजी आमदार राजू पाटील तसेच मनसेच्या अविनाश जाधवांपासून विविध महत्वाच्या नेत्यांसोबत यांचे चांगले संबंध होते. त्यामुळे या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी अंबरनाथसाठी नवा शहराध्यक्ष नेमला.
शैलेश शिर्के यांना शहरअध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. त्यानंतर शुक्रवारी राज ठाकरे यांच्या भेटीनंतर शहरातील कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली. यात अनेक नव्या तसेच जुन्या पदाधिकाऱ्यांना स्थान मिळाले आहे.